डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील वीर जिजामाता छेद रस्त्यावर गणपती मंदिराजवळ भूमाफियांनी दोन दिवसापूर्वी पालिकेच्या विकास आराखड्यातील सामासिक अंतरात, परिसरातील नागरिकांचा वर्दळीचा रस्ता अडवून दोन बेकायदा गाळे दिवसाढवळ्या बांधले. कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने भूमाफियांना गाळ्यांची कामे तातडीने थांबविण्याची सूचना केली. तरी, भूमाफियांनी पालिका अधिकाऱ्यांना न जुमानता दोन्ही गाळ्यांची बांधकामे बुधवारी पूर्ण करून या बेकायदा गाळ्यांमध्ये दुकाने सुरू करण्याची धडपड सुरू केली आहे.

आठ फूट उंचीचे हे गाळे घाईघाईत उभारण्यात आले आहेत. या बेकायदा गाळ्यांची उभारणी करून त्याला तातडीने प्लास्टर आणि रंगरंगोटी करून हे गाळे कसे जुने आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न भूमाफियांनी केला आहे. आपल्या प्रभागात एकही बेकायदा बांधकाम नव्याने उभे राहता कामा नये, असे कठोर आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तरीही डोंबिवली पश्चिमेत सुभाष रस्त्यावर ह प्रभाग साहाय्यक आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या पथकाला न जुमानता भूमाफियांनी पालिकेच्या सार्वजनिक रस्त्याची रस्तारेषा हडप करून बेकायदा गाळे बांधल्याने परिसरातील नागरिक, रिक्षा चालक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

तात्काळ रंगरंगोटी

पालिकेच्या ह प्रभाग साहाय्यक आयुक्तांनी भूमाफियांना बेकायदा गाळ्यांची उभारणी तात्काळ थांबविण्याचे आदेश देऊनही भूमाफियांनी दादागिरी, दहशत आणि राजकीय दबाव टाकून या बेकायदा गाळ्यांची उभारणी केली असल्याची चर्चा सुभाष रस्ता परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांमध्ये सुूरू आहे. तीन दिवसात उभारलेल्या या बेकायदा गाळ्यांचे बांधकाम ओले आहे. या बांधकामाला पुरेसे पाणी न वापरता त्याचा वापर भूमाफियांनी दुकानासाठी सुूरू करण्याच्या हालचाली केल्या आहेत. हे ओले बांधकाम हे गाळे खरेदी करणाऱ्या आणि तेथे दुकान सुरू करणाऱ्या दुकानदार, त्यांच्या कामगाराच्या अंगावर पडून जीवित हानी झाली तर त्याची जबाबदारी भूमाफिया, पालिका प्रशासन घेणार आहे का, असे प्रश्न नागरिक, तक्रारदार करत आहेत.

राजकीय दबाव

एका स्थानिक भूमाफियाने दहशतीचा, स्थानिक राजकीय आशीर्वादाने अवलंब करून हे बेकायदा गाळे बांधले असल्याची सुभाष रस्ता भागात चर्चा आहे. आयुक्त अभिनव गोयल यांनी ह प्रभाग साहाय्यक आयुक्त विजय भोईर यांना रस्ता सामासिक अंतरात येत असलेले हे दोन्ही बेकायदा गाळे जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्याची मागणी तक्रारदार करत आहेत.

एका नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्यांना संपर्क करून या बेकायदा गाळ्यांवर कारवाई करू नका म्हणून दमदाटी केल्याची चर्चा पालिकेत आहे. या बेकायदा गाळ्यांना पाठबळ दिले म्हणून पालिका अधिकाऱ्यांनी या नगरसेवकासह भूमाफियावर ‘एमआरटीपी’चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदाराकडून आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. या राजकीय व्यक्तीवर लवकरच कारवाईसाठी एका स्थानिक रहिवासी प्रयत्न करत आहे.

दुमजली बांधकाम

दोन गाळे बांधून जागा हडप केल्याने आता त्या गाळ्यांवर दुमजली बांधकाम करून तेथे मोठा इमला उभारण्याची भूमाफियांची योजना असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या दोन्ही बेकायदा गाळ्यांमुळे नागरिकांचा येण्याचा जाण्याचा रस्ता बंद झाल्याने नागरिक, वाहन चालक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

‘संबंधित गाळेधारकांना गाळ्यांची बांधकामे तातडीने काढून घेण्याची सूचना केली आहे. त्यांनी ती बांधकामे विहित मुदतीत काढून घेतली नाहीतर पालिका ते गाळे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करील,’ असे साहाय्यक आयुक्त विजय भोईर यांनी सांगितले.