डोंबिवली – येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेतर्फे आयोजित रौप्यमहोत्सवी आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत ४७० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी लहान गटातील विद्यार्थ्याने श्रीकृष्णाच्या वेषात येऊन चित्रकला साहित्याने भरलेली हंडी फोडली. विविध गटांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे ज्येष्ठ वास्तुशास्त्रज्ञ अलंकार तायशेटे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व चषक प्रदान करून गौरविण्यात आले.
शुक्रवारी डोंबिवली पूर्वेतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रामचंद्रनगर शाखेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, शिरीष फडके, डाॅ. कुलकर्णी ,सहकार्यवाह उंटवाले, सदस्य नंदू जोशी, माधुरी जोशी, संजय दीक्षित, प्रकाश म्हात्रे यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे स्पर्धाप्रमुख मीरा कुलकर्णी, गवळी, शाळास्तर प्रमुख उर्मिला चव्हाण सर्व शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,विभागप्रमुख शाळाप्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळी यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात चित्रकलेचे महत्त्व विशद केले. चित्रकलेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पनाशक्तीला आणि कलागुणांना वाव मिळतो, असे सांगत त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना पुढील यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या. गवारी, साखरे, भगत, जोगमार्गे, लोहार, इंगळे यांनी परीक्षक म्हणून काम केले. जोगमार्गे यांनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेचे नियोजन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रामचंद्र नगर शाळेच्या उर्मिला चव्हाण यांनी केले होते.
