डोंबिवली : मागील दोन वर्षांच्या कालावधीत डोंबिवलीतील एका खासगी गुंतवणूकदारांच्या संचालकांनी शहर परिसरातील ६८ गुंतवणूकदारांची एकूण सात कोटी नऊ लाखांची फसवणूक केली आहे. वाढीव परतावा नाहीच, पण मूळ रक्कम परत मिळण्याची शाश्वती नसल्याने या गुंतवणूकदारांनी सहा संचालकांच्या विरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार केली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला आहे.
मुंबई मालाड येथील मालवणी निर्मिती सोसायटी, म्हाडा काॅलनीत राहणारे वडापाव विक्रेते रूपेश सायगावकर यांच्या व इतर फसवणूक झालेल्या ६७ जणांच्या तक्रारीवरून पोलिसांनी या गुन्ह्यांची नोंद करून घेतली आहे.
संचालकांची नावे
डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावर कारवा रुग्णालयासमोर शांताकुंज बंगल्यामध्ये प्रोगेन रेंटल मार्केटिंग सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीचे कार्यालय आहे. या कंपनीचे मालक, संचालक संजय व्यंकटेश नर, प्रशांत जगदीश आंगणे, पल्लवी आंगणे, लक्ष्मण ज्ञानेश्वर यादव, जितू गाला व प्रिया विश्वकर्मा हे आहेत. या संचालकांनी संगनमत करून आपली आर्थिक फसवणूक केली असल्याची तक्रार तक्रारदार सायगावकर यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.
तक्रारीचे स्वरूप
तक्रारदार सायगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे, की आपणास २०१८ मध्ये एक एलआयसी पाॅलिसी काढायची होती. त्यावेळी संभाजी बाबणे यांच्याकडून आपणास समजले की, प्रशांत आंगणे हे ‘कोकण स्मार्ट शेअर ब्रोकर’ कंपनी चालवतात. आपण आंगणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी आपणास कांदिवली शाखेशी संपर्क साधण्यास सांगितले. आंगणे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आपण पाच हजार रुपये, त्यानंतर तीन लाख रुपये ‘कोकण स्मार्ट शेअर ब्रोकर’ कंपनीत धनादेशाने भरले. या गुंतवणूक रकमेवर आपणास पाच टक्के व्याजाने सहा महिन्यांनी एक लाख पाच हजार व्याज मिळणार होते.
सहा महिन्यांनी आपण व्याज घेण्यासाठी कोकण स्मार्ट कंपनीच्या कांदिवली शाखेत गेलो. तेथे आपणास रक्कम मिळण्यास ४५ दिवसांचा अवधी लागेल असे सांगण्यात आले. आपणास विविध कारणे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तेथे आपल्याकडून ‘प्रशांत आंगणेंना मी कर्ज दिले आहे. ते आम्हाला व्याजाचे पैसे देत आहेत, असे नोटरी दस्तांवर लिहून घेतले. कांदिवली शाखेत गेल्यावर तेथील कार्यालय बंद होते. आपण भांडुप येथील मुख्य कार्यालयात गेल्यावर तेथे आपणास रद्द केलेला धनादेश व पैसे काढण्याची पावती देण्यात आली. ते आपण ऑनलाइन माध्यमातून जमा केले. आपणास २०२३ मध्ये एक ई-मेल आला. त्यात कंपनी सहा महिने बंद आहे. त्यामुळे आपणास फक्त तीन महिन्यांचे व्याज मिळेल असे कळविले होते.
नवी कंपनी
मे २०२३ मध्ये प्रशांत आंगणे यांनी गुंतवणूदारांची फसवणूक केल्याने त्यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन ते अटक असल्याचे समजले. त्यानंतर ते जामिनावर सुटून बाहेर आले आहेत. प्रशांत आंगणे यांची एक दृश्यध्वनी चित्रफित आपणास पाहण्यास मिळाली. त्यात त्यांनी म्हटले होते की, आपण पुन्हा नव्याने कंपनी सुरू करणार आहोत. आपण डोंबिवलीत त्यांची भेट घेतली. त्यांनी आपणास अडकलेल्या ५ लाख ३७ हजाराच्या गुंतवणुकीवर आपणास २२ महिन्याचा परतावा मिळेल असे त्यांनी सांगितल्याने आपण ८० हजार ५५० रूपये आंगणे यांच्याकडे धनादेशाने भरले. ही रक्कम ऑनलाइन मिळणार असल्याचे सांगून रक्कम देण्यास टाळाटाळ केली.
कोकण स्मार्टमध्ये गुंतवलेली रक्कम कधी मिळणार म्हणून आपण नवीन प्रोग्रेन रेंटल कंपनीच्या नवे मालक, संचालकांकडे विचारणा करू लागलो. आपणास उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली. या प्रकारानंतर आपणास या कंपनीने एकूण ६८ जणांची एकूण ७ कोटी ९ लाख रूपयांची फसवणूक केली असल्याचे समजले. या गुंतवणूकदारांकडून १४ लाख ते ८४ लाखाच्या गुंतवणूक रकमा या कंपनीने घेतल्या आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
