शेअर बाजारात पैसे गुंतवून देतो, या माध्यमातून चांगला परतावा मिळेल, असे डोंबिवलीतील गुंतवणूकदारांना दोन तरूणांनी सांगितले. त्यांच्याकडून लहान, मोठी एकूण १० लाख ३० हजार रूपयांची रक्कम बेकायदा जमा केली. मात्र त्यानंतर ठरलेल्या मुदतीत गुंतवणूकदारांना आकर्षक परताना मिळवून न देता त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद हर्ष दाणी (३५), सुयश अरूण भागवत (२०) अशी फसवणूक करणाऱ्या तरूणांची नावे आहेत. २०१८ पासून हे तरूण गुंतवणूकदारांना फसवित होते. आनंद, सुयश यांनी डोंबिवलीतील एका ४७ वर्षाच्या महिलेला गुंतवणूक योजनेची माहिती दिली. आपण आमच्या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक शेअर बाजारात केली जाईल. तुम्हाला चांगला आकर्षक परतावा मिळेल. आपण आणखी सहा सदस्य गुंतवणुकीसाठी तयार केले तर कमी कालावधीत जास्तीचा परतावा तुम्हाला मिळेल, असे आश्वासन या तरूणांनी महिलेला दिले होते.
या तरूणांच्या माहितीवर विश्वास ठेवत महिलेसह इतर सहा जणांनी एकूण १० लाख ३० हजार रूपयांची रक्कम जमा करून ती या तरूणांच्या स्वाधीन केली. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी तरूणांनी गुंतवणूकदारांबरोबर सामंजस्य करारपत्र तयार केले.
पाच वर्षाच्या कालावधीत आकर्षक परतावा मिळेल म्हणून गुंतवणूकदार महिलेने तरूणांकडे गुंतवणुकीवरील परतावा देण्याची मागणी केली. सुरूवातीला त्यांनी सकारात्मकता दाखवली. नंतर त्यांनी महिलेसह गुंतवणूकदारांना भेटी न देणे, गुंतवणुकीची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यास सुरूवात केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आपली फसवणूक या तरूणांनी केली आहे हे गुंतवणूकदार महिलेच्या लक्षात आले. तिने रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन दोन्ही तरूणांविरुध्द तक्रार केली. इतर गुंतवणूकदारही तक्रार करण्यास पुढे येत आहेत. पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय आस्थापनांमध्ये हितसंबंध रक्षण कायद्यान्वये तरूणांविरुध्द गुन्हा दाखल केला. साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.