डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा भागातील जगदंबा माता ट्रस्टतर्फे आयोजित नवरात्रोत्सव कार्यक्रमाच्यावेळी नाल्यात पडून आयुष कदम (१३) हा बालक मरण पावला होता. या दुर्घटनेचा ठपका आयोजक म्हणून आपल्यावर आल्याने जगदंबा मंदिर ट्रस्टने या मृत बालकाच्या कुटुंबीयांना आठ लाखाची भरपाई दिली होती.
या घटनेला चार महिने उलटून गेल्यानंतर कल्याण डोंबिवली पालिकेचे ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी जगदंबा ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव आणि इतर पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून आयोजनातील निष्काळजीपणा, बालकाच्या मृत्यूप्रकरणाला सर्वस्वी आपण जबाबदार असून आपणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, अशी नोटीस पाठवली आहे.
मृत बालकाच्या कुटुंबीयांना आठ लाख रूपयांची भरपाई जगदंंबा माता ट्रस्टतर्फे देऊनही कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी आयोजनातील निष्काळजीपणा, बालकाच्या मृत्युचा ठपका ठेवत ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना तुमच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा का दाखल करू नये याचा खुलासा ४८ तासाच्या आत करण्याची नोटीस बजावल्याने पदाधिकाऱ्यांंनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आपण म्हणणे मांडले नाहीतर आपल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नोटीस बजावली आहे.
पाय घसरला
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये देवीचापाडा येथील जगदंबा माता ट्रस्टतर्फे नवरात्रोत्सव आयोजित केला होता. दररोज येथे भोजन भंडारा सुरू होता. रात्रीच्या भोजन करून आयुष कदम नाल्याच्या बाजुला हात धुण्यासाठी गेला. तेथे नाल्यावरील झाकण भोजनाची भांडी, खरकटे टाकण्यासाठी बाजुला करून ठेवण्यात आले होते. या कालावधीत मुसळधार पाऊस सुरू होता. आयुष नाल्यावरील उघड्या झाकणाच्या द्वारातून पाय घसरून नाल्यात पडून वाहून गेला. अग्निशमन जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.
न्यायालयाकडून दखल
कल्याण डोंबिवली पालिकेच्या नियंत्रणाखालील हा भाग आहे. या भागात नवरात्रोत्सव, दररोज भोजन भंडारा होत आहे. तेथे योग्य सुरक्षा आहे की नाही याची चाचपणी करण्याची जबाबदारी पालिकेची होती. पालिकेचा एक अधिकारी या कालावधीत याठिकाणी फिरकला नाही. नाला पालिकेचा असला तरी त्यावरील नवीन वळण रस्ते कामे एमएमआरडीएकडून सुरू होती.
बालक मृत्युची मुंबई उच्च न्यायालयाने स्वताहून गंभीर दखल घेतली. कल्याण डोंबिवली पालिकेला या मृत बालकाच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश दिले.
पालिकेची नोटीस
नवरात्रोत्सवाचे आयोजक म्हणून जगदंबा माता ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आयुषच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून आठ लाख रूपये दिले. आयुषच्या वडिलांनी नोटरी कागदपत्रावर आपल्या मुलाच्या मृत्युप्रकरणाला आयोजक जबाबदार नसल्याचे लिहून दिले. न्यायालयाचे निर्देश असल्याने ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सावंत यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून नवरात्रोत्सवाच्यावेळी मंडप उभारताना पालिकेची परवानगी न घेणे, नाल्यावरील झाकण उघडे ठेऊन भांडी धुण्यासाठी नियमाबाह्यपणे वापरणे आणि घडल्या घटनेला आयोजकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तंबी दिली आहे.
जगदंबा माता मंदिर ट्रस्टतर्फे आम्ही आठ लाख रूपयांची भरपाई आयुष कदमच्या पालकांना दिली आहे. तसे नोटरी पध्दतीने त्यांनी आम्ही या घटनेला जबाबदार नसल्याचे लिहून दिले आहे. आता पालिकेने आम्हाला नोटीस पाठवून फौजदारी गु्न्हा दाखल करण्याचे कळविले आहे. – दिवाकर शेट्टी, अध्यक्ष, जगदंबा माता मंदिर ट्रस्ट, डोंबिवली.

