डोंबिवली : विविध प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया केल्यामुळे व पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असलेले डोंबिवलीजवळील कचोरे भागातील पत्रीपूल, नेतिवली होमबाबा टेकडी भागातील दोन तडीपार गुंड कल्याण गुन्हे शाखा, टिळकनगर पोलिसांनी दोन वेगळ्या कारवायांमध्ये ताब्यात घेतले आहेत. या दोघांनी तडीपारी आदेशाचा भंग केला म्हणून टिळकनगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय अर्जुन कांबळे (वय २९) असे तडीपार गुंडाचे नाव आहे. प्रतिक राजेंद्र पाटील (२४) असे दुसऱ्या तडीपार गुंडाचे नाव आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील तो तडीपार गुंड आहे.
कल्याण गुन्हे शाखेचे गस्ती पथक गेल्या आठवड्यात आपल्या पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. त्यांचे वाहन कचोरे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या घराच्या भागात आले. त्यावेळी त्यांना पाहून एक इसम तेथील झोपडपट्टीच्या दिशेने पळून जाऊ लागला. पोलिसांना संशय आला. पोलिसांनी चपळाई करून वाहनातून उतरून त्या तरूणाचा पाठलाग करून त्याला रोखले. त्याने आपले नाव प्रतिक राजेंद्र पाटील असे सांगितले.
संध्याकाळच्या वेळेत तू याठिकाणी काय करतोस असे विचारल्यावर पोलिसांना तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे तो गंभीर गुन्हा करण्यासाठीच या भागात आला असावा, याची खात्री पटल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची माहिती काढल्यावर तो कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील हद्दपार गुंड असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याने हद्दपारी आदेशाचा भंग केला म्हणून त्याच्यावर हवालदार सुधीर कदम यांच्या तक्रारीवरून गु्न्हा दाखल केला.
दुसऱ्या एका प्रकरणात, टिळकनगर पोलीस आपल्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना नेतिवली जवळील होमबाबा टेकडी जवळील स्नेहवर्धन नगर भागात एक इसम संशयास्पद स्थितीत फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला रोखले व त्याची ओळख काढली. त्याने आपले नाव अजय कांबळे सांगितले. त्यावेळी पोलीस उपायुक्तांनी त्याला २४ महिन्यांसाठी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातील हद्दपार केले असल्याचे कारवाई पथकाला समजले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर पोलीस आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला. या कारवाईत कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, हवालदार गुरूनाथ जरग, सचीन भालेराव, टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, साहाय्यक पोलीस निरीक्षक विसपुते, हवालदार हांडे सहभागी झाले होते.
