कल्याण – एक ते दोन तास दोन ते तीन किलोमीटरच्या रांगेत उभे राहून पेट्रोल मिळत नसल्याने अनेक दुचाकी स्वारांना रस्तोरस्ती बंद पडलेल्या आपल्या दुचाकी लोटत, ढकलत पेट्रोल मिळत असलेल्या पेट्रोलपंपापर्यंत किंवा तेथून घरी न्याव्या लागत आहेत. रणरणत्या उन्हात खराब रस्त्यावरून दुचाकी नेताना दुचाकी स्वार घामाघूम होत असल्याचे कल्याण, डोंबिवली शहरात दिसू लागले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहरातील अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपले आहे. ज्या पेट्रोल पंपांवर पेट्रोल आहे त्या ठिकाणी दोन ते तीन किलोमीटरच्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या आहेत. रांगेत राहुनही पेट्रोल मिळेल याची खात्री नाही. आपल्या दुचाकी, मोटारीत पेट्रोल नसल्याने अनेक वाहन चालक पेट्रोल पंपाबाहेर पेट्रोलसाठी क्रमांक येत नाही तोपर्यंत आशाळभूतपणे ताटकळत उभे राहत आहेत.

पेट्रोल संपले आणि पेट्रोल पंपावर तसा फलक लावण्याची हालचाल कर्मचाऱ्यांनी सुरू केली की पेट्रोलसाठी तासन तास रांगेत उभे असलेल्या वाहन मालकांच्या पोटात गोळा येत आहे. मोटार, दुचाकीत थोडे पेट्रोल आहे. आपण थोड्या अंतरापर्यंतचा प्रवास पार करू असा विचार करून काही दुचाकी स्वार, मोटार कार चालक आपली वाहने चालवित आहेत. काही अंतरावर गेल्यानंतर ही वाहने बंद पडत आहेत. अशावेळी पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही. वाहनातील पेट्रोल संपले अशा परिस्थिती आपले वाहन रस्त्यावर उभे ठेऊन जायचे कोठे, असा प्रश्न वाहन मालक, चालकांना पडत आहेत.

दोन दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहराच्या अनेक भागात अनेक दुचाकी स्वार, मोटार कार चालक रस्तोरस्ती आपली बंद पडलेली कार रस्त्याच्या कडेला आपल्या साथीदारांच्या साहाय्याने आणून ती लाॅक करून घरी निघून जात आहेत. काही दुचाकी स्वार घामाघूम होत आपले दुचाकी वाहन लोटत, अन्य सहकाऱ्यांची मदत घेत घरापर्यंत नेत आहेत. शहरातील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळते याची माहिती मिळाल्यावर काही दुचाक स्वार आपली वाहने लोटत पेट्रोलपंपापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

अनेक दुचाकी मालक आपल्या दुचाकीचा वापर मुलांना शाळेत सोडणे, तेथून घेऊन आणणे यासाठी करतात. दुचाकीत पेट्रोल नसल्याने अशा रहिवाशांना आता रिक्षेतून प्रवास करावा लागत आहे.

रस्त्यावरील वर्दळ घटली

पेट्रोल मिळत नसल्याने रस्त्यावरील दुचाकी, मोटारींची ५० टक्के वर्दळ घटली असल्याचे दृश्य कल्याण, डोंबिवलीत दिसत आहे. अनेकांनी आपल्या दुचाकी बंद पडलेल्या ठिकाणी उभ्या करून ठेवल्या आहेत. तर काहींनी आपल्या घराच्या आवारात दुचाकी, मोटारी उभ्या करून ठेवल्या आहेत. पेट्रोल अभावी वाहन बाहेर काढणे शक्य होत नाही. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाली आहे.

काळ्या बाजारात पेट्रोल

पेट्रोल मालकाशी संधान असलेल्या काहींनी पेट्रोल पंप चालकाकडून डबे, कॅन, पिंपातून पेट्रोल खरेदी करून ते घराच्या परिसरातील झाडझुडपात, शीतपेयाच्या बाटल्यांमध्ये भरणा करून एक लीटरची बाटली दीडशे रूपयांना या किमतीने विकण्यास सुरूवात केली असल्याची शहरात चर्चा आहे. अनेक पेट्रोल पंप चालकांनी पिंप, कॅनमधून पेट्रोल विकले असल्याने त्यामुळेही पेट्रोल टंचाई शहरात निर्माण झाल्याची चर्चा आहे.