Dombivli Kalyan Roads – कल्याण, डोंबिवलीतील अनेक रस्त्यांची खड्यांमुळे चाळण झाली आहे. या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेले सिमेंट काँक्रिट आणि खडीचा गिलावा गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या कडक उन्हामुळे सुकून गेला आहे. या रस्त्यांवरून वाहने नेताना या धुळीचा सर्वाधिक त्रास प्रवाशांना होत आहे. सिमेंट मिश्रित ही धूळ असल्याने नागरिक, प्रवासी, वाहन चालकांना सर्दी, खोकल्यांचे त्रास सुरू झाले आहेत.

खड्डे पडलेल्या रस्त्यांवर पालिकेने गेल्या दोन महिन्यांच्या काळात पावसाचा अंदाज घेऊन माती आणि खडीचे मिश्रण, सिमेंट आणि खडीचे मिश्रण टाकून रस्ते सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही दिवसांपासून कडक उन पडत आहे. या उन्हामुळे खड्ड्यांमध्ये टाकलेली माती, सिमेट काँक्रिट सुकून गेले आहे. या रस्त्यांवरून सतत वाहने धावत असल्याने ही धूळ प्रवाशांना त्रासदायक होत आहे.

हेही वाचा – Badlapur School Case : बदलापुरात आंदोलन का पेटले? पोलिसांचा निष्काळजीपणा, शाळा प्रशासनाचे मौन आणि…

डोंबिवली पूर्वेतील टिळक रस्त्यावर डांबरीचे आवरण राहिले नाही. या रस्त्यावरून वाहनांची सर्वाधिक वर्दळ असते. या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो. याशिवाय या भागात राहत असलेल्या आजुबाजूच्या इमारतींमधील रहिवासीही धुळीने हैराण आहेत. याच भागात सावरकर रस्ता, शेलार नाका, मानपाडा रस्ता, नांदिवली स्वामी समर्थ मठ रस्ता, डोंबिवली पश्चिमेत सुभाष रस्ता, रेल्वे मैदान ते एकविरा पेट्रोल पंप रस्ता, संत ज्ञानेश्वर मार्ग ते गोपीनाथ चौक रस्ता, दोन पाण्याच्या टाक्या बीएसएनल ते योग कुटीर इमारत रस्ता, कल्याणमध्ये कोळसेवाडी, काटेमानिवली, विठ्ठलवाडी रस्ता, पश्चिमेत शहाड-मोहने रस्ता, शहाड रेल्वे स्थानक उड्डाण पूल, मुरबाड रस्ता भागातील रस्ते खराब झाल्याने या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा – ठाणे : मागील पाच महिन्यांत महिलांवरील लैंगिक अत्याचाराची १४६ प्रकरणे

डोंबिवली पश्चिमेत काही रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहेत. या विभागाकडून अद्याप कामे हाती घेतली जात नसल्याने नागरिकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. ही कामे लवकर या विभागाने हाती घ्यावीत यासाठी कल्याण डोंबिवली पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता विचारात घेऊन कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सुरू असलेली रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. आचारसंहिता लागल्यानंतर आणि त्यानंतर राज्य सरकारात काही हालचाली झाल्यातर निधीची चणचण नको म्हणून पालिकेने पाऊस सुरू असूनही शहरातील काँक्रिट रस्ते पूर्ण करण्यासाठी जोर लावला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून आलेल्या निधीतून शहरांमध्ये काँक्रिटची कामे सुरू आहेत.