डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावर मानपाडा भागातील रुणवाल गार्डन गृहसंकुल परिसरात वाहतुकीचे नियोजन करत असताना कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या हवालदाराला अनेक वाहने उलट मार्गिकेतून येत असल्याचे दिसले. त्यांनी ती वाहने रोखून पुन्हा माघारी पाठविण्यास सुरूवात केली. यावेळी उलट मार्गिकेतून दुचाकीवरून मालाची गोणी घेऊन येणाऱ्या दुचाकी स्वाराने हवालदाराला पाहून दूर अंतरावर आपली दुचाकी रस्त्यावर गोणीसह सोडून पळ काढला. ही गोणी तपासल्यावर त्यात गुंगी आणणाऱ्या कोडीनयुक्त कफ सिरपच्या बाटल्यांचा साठा असल्याचे आढळले. पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्याच्या उपस्थितीत हा साठा जप्त करून संबंधित वाहन मालकावर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिनीनाथ बडे असे तक्रारदार वाहतूक हवालदाराचे नाव आहे. बडे यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, बुधवारी दुपारी चार वाजता आपण शिळफाटा रस्त्यावर मानपाडा भागातील रुणवाल गार्डन संकुला समोरील रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम करत होतो. काटईकडून कल्याणकडे जाणारी वाहतूक जाम होत चालल्याने अनेक वाहन चालक शिळफाटा काटईकडे जाणाऱ्या मार्गिकेतून उलट दिशेने मानपाडा चौकाकडे येत होते. या वाहनांमुळे आणखी कोंडी होण्याची शक्यता होती.

त्यामुळे मी स्वता, वाहतूक सेवक अमोल उबाळे, हितेश चव्हाण यांनी उलट मार्गिकेतून येणारी वाहने रोखून ती पुन्हा माघारी पाठवली. यावेळी उलट मार्गिकेतून एक दुचाकी स्वार दुचाकीच्या पाठीमागच्या आसनावर गोणी ठेऊन आमच्या दिशेने येत होते. त्याला आम्ही मागे जाण्याची खूण करताच, त्या दुचाकी स्वाराने दुचाकी त्याच्याजवळील गोणीसह रस्त्यावर सोडून तो वाहनांच्यामधून मार्ग काढत शिळफाटा दिशेने पळून गेला.

गोणींमध्ये कोडीन बाटल्यांचा साठा

दुचाकीसह गोणी वाहतूक पोलिसांनी रुणवाल गार्डन वाहतूक पोलीस चौकात आणली. तेथे पोलीस निरीक्षक गजानन पडळकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक के. आर. पाटील, अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे प्रेमदास साखरे, हवालदार लक्ष्मण साहरे पंचांसह दाखल झाले. ही गोणी उघडण्यात आली. त्यात कोडीनयुक्त नशा आणणाऱ्या सिरपच्या ९९ बाटल्या आढळल्या. या बाटल्यातील द्रव्याचे साखरे यांनी नमुने घेतले. या बाटल्यांवर कोडिन फाॅस्फेट ट्रिपोलीडिन हायड्रोक्लोरिक सिरप, वेलक्रिक्स कफ सिरप (गुंगीकारक औषध) नावाचे लेबल आढळले.

या कारवाईत पोलिसांनी २६ हजाराचा सिरपचा साठा जप्त केला. याप्रकरणी दुचाकी स्वारावर डाॅक्टरांची पूर्वपरवानगी न घेता हा साठा विक्रीसाठी बाहेर काढला. तसेच यासंदर्भात कोणताही परवाना नसताना या औषधी द्रव्याची वाहतूक केली म्हणून दुचाकी स्वारावर अंमली पदार्थ तस्करी आणि अन्न आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याने हवालदार मिनीनाथ बडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.