डोंबिवली – कल्याण शिळफाटा या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर मानपाडा चौक भागात मुख्य रस्त्यावर नियमबाह्यपणे आपली फॉर्च्युनर कार उभी करून वाहतुकीला अडथळा एका कार चालकाने निर्माण केला. या फॉर्च्युनर कार चालकाला कोळसेवाडी वाहतूक विभागाच्या हवालदाराने वाहन बाजुला घेण्यास सांगताच, मी गाडी बाजुला घेणार नाही असे बोलत या फॉर्च्युनर चालकाने वाहतूक पोलिसाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत गणवेशाची गळपट्टी धरून ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यापुढे कुठेही दिसला तरी तुझ्या अंगावर गाडी घालून तुला जीवे ठार मारीन, अशी धमकी दिली, अशी तक्रार वाहतूक हवालदाराने मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.

डोंबिवलीतील या फॉर्च्युनर कार चालकाच्या आरटीओकडे नोंदणीकृत वाहन क्रमांक हा ‘एमएच-०५-ईएक्स-४१४२’ असा आहे. कोळसेवाडी वाहतूक विभागाचे हवालदार उमेश जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी डोंबिवलीतील फॉर्च्युनर वाहनाचा चालक, मालक यांच्या विरूध्द सरकारी कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा चौक भागात घडली.

हवालदार जाधव यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की शिळफाटा रस्त्यावर शुक्रवारी दुपारी वाहतूक विभागाचे हवालदार बच्छाव, मुंढे, वाहतूक सेवक अमोल हुबाळे, सुभाष पाडाळे आम्ही वाहतूक नियोजनाचे काम करत होतो. दुपारी साडे तीन वाजण्याच्या दरम्यान वाहतूक सेवक वाहतूक चौकीत भोजनासाठी गेले. त्यावेळी आपण मानपाडा चौक, पेट्रोल पंप, विद्यानिकेतन छेद रस्त्याच्या भागात वाहतूक नियोजनाचे काम करत होतो. यावेळी कल्याणकडून शिळफाटा दिशेने जाणारी वाहतूक मंदावून शिळफाटा दिशेच्या मार्गिकेवर वाहन कोंडी होऊ लागली म्हणून आपण मानपाडा चौक ते उंबार्ली विद्यानिकेतन शाळा छेद रस्त्यावरील मुख्य रस्त्यावर उभी असलेली वाहने चालकांना हटविण्यास सुरूवात केली.

चालकाची अरेरावी

शिळफाटा मुख्य रस्त्यावर एक फॉर्च्युनर कार उभी आहे. त्यामुळे कोंडी होत असल्याचे लक्षात आल्यावर हवालदार शिंदे यांनी त्या वाहनाच्या चालकाजवळ जाऊन आपले वाहन बाजुला घ्या. वाहन कोंडी होत आहे, असे सांगितले. त्यावेळी चालकाने वाहनातून बाहेर येऊन मी गाडी बाजुला घेणार नाही असे बोलत ते वाहनातून खाली उतरून आपणास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करू लागले. त्यांनी आपण केलेल्या सूचनेचा गैरअर्थ काढून आपणास ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

इतर प्रवासी, वाहन चालक आपले वाहन रस्त्यामधून बाजुला घ्या, असे फॉर्च्युनर कार चालकाला (वाहन क्रमांक एमएच-०५-ईएक्स-४१४२) सांगुनही ते मी वाहन बाजुला घेणार नाही असे अडुन बसले होते. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहन कोंडी झाली होती.वाहन चालक वाहन बाजुला घेत नसल्याने आपण त्या वाहनाचे मोबाईलमधून चित्रीकरण सुरू केले. ते चित्रण वरिष्ठांना पाठविण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी तुम्ही माझ्या वाहनाचे चित्रीकरण का करता, असे विचारून फॉर्च्युनर वाहन चालकाने आपला मोबाईल हातामधून खाली पाडला. त्याचे नुकसान केले. तसेच, तु कोठेही वाहतूक नियोजन करताना दिसला की तुझ्या अंगावर गाडी घालून तुला जीवे ठार मारतो, अशी धमकी वाहन चालकाने हवालदार जाधव यांना दिली.

फॉर्च्युनर कार चालक दाद देत नसल्याने अखेर वाहतूक पोलिसांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठुन अरेरावी करणाऱ्या चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला.