डोंबिवली – डोंबिवली जवळील बदलापूर-तळोजा रस्त्यावरील खोणी पलावा या मध्यवर्गिय, उच्चभ्रूंच्या वस्तीमधील डाऊन टाऊन इमारतीमधील एका सदनिकेत दोन कोटीहून अधिक रकमेच्या मेफेड्राॅन (एमडी) या अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी मोहम्मद रहिम सलीम शेख उर्फ फहरान (३२) याला मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. तो मुंब्रा येथील रहिवासी आहे.
फहरानच्या अटकेमुळे अंमली पदार्थ तस्करीतील अटक आरोपींची संख्या चार झाली आहे. अटकेत एका महिलेचा समावेश आहे. खोणी पलावा या उच्चभ्रूंच्या वसाहतीमधील डाऊन टाऊन इमारतीच्या एका सदनिकेत अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना मिळाली होती. उपायुक्त झेंडे यांच्या आदेशावरून मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या आठवड्यात पोलीस पथकाने पाळत ठेऊन डाऊन टाऊन इमारतीमधील सदनिकेवर रात्रीच्या वेळेत छापा टाकला.
सदनिकेत असिल जावर सुर्वे (२६), मोहम्मद इसा मोहम्मद हनीस कुरेशी आणि महिला आरोपी मेहेर फातिमा रिजवान कुरेशी यांचा वावर आढळला. या सदनिकेतून पोलिसांनी एक किलो ९३ ग्रॅम वजनाची एमडी पावडर जप्त केली. या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत दोन कोटी १२ लाख रूपये आहे. या प्रकरणातील महिला एमडी पावडर विक्रीसाठी इतर आरोपींना मदत करत होती. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या तिघांंचा म्होरक्या मुख्य आरोपी मुंब्रा येथील रहिवासी फहरान पोलिसांंच्या छाप्यानंतर फरार झाला होता. उपायुक्त झेंडे यांच्या आदेशानंतर पोलिसांची विशेष स्वतंत्र पथके फहरानचा शोध घेत होती. फहरान हैदराबादला पळून गेला आहे. तेथून तो राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बहरीन देशात पळून जाणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ हालचाली करून गेल्या आठवड्यात हैदराबाद गाठले. २९ जून रोजी फहरान विदेशात पळून जाणार होता.
फहरान विमानतळावर येताच सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून अटक केली. मानपाडा पोलिसांनी त्याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फहरानच्या अटकेने एमडी पावडर तस्करीतील एक मोठी आंतरराष्ट्रीय टोळी उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. फहरान मुंब्रा शहरात मोटारी खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
फहरान अमली पदार्थांचा तस्कर आहे का. त्याचा अन्य काही व्यवसाय आहे का, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फहरानच्या अटकेची कारवाई पोलीस निरीक्षक राम चोपडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक कलगौडा पाटील, संपत फडोळ, महेश राळेभात, सागर चव्हाण, हवालदार मिननाथ बडे, किशोर दिघे यांच्या पथकाने केली.