कल्याण – अंमली पदार्थ तस्करीत सहभागी असणारे आणि अशा गुन्ह्यांमध्ये वाशी पोलिसांना हवे असलेले काही नायजेरियन गुन्हेगार डोंबिवली जवळील खोणी पलावा येथील उच्चभ्रू सोसायटीत राहत असल्याची माहिती मिळाल्यावर गेल्या आठवड्यात नवी मुंबई आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून या भागातून २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले. या परदेशी नागरिकांना पोलिसांना कोणतीही पूर्व सूचना न देता घर भाडे देणाऱ्या आणि भारत सरकारच्या परदेशी नागरिक संकेतस्थळावर या नायजेरियन नागरिकांची माहिती न देणाऱ्या मूळ ११ घर मालक आणि या नागरिकांना घर भाड्याने देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या नवी मुंबई खारघर येथील एका एजंटवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घर मालक अडचणीत
नवी मुंबईत खारघर येथे राहणारे घर खरेदी विक्रीमधील मध्यस्थ सुदाम गोरे यांनी खोणी पलावा भागात परदेशी नागरिकांना अधिक प्रमाणात मूळ मालकांशी संगनमत करून घर वास्तव्यास दिल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थ सुदाम गोरे यांच्यासह नायजेरियन नागरिकांना घर भाड्याने देणारे खोणी पलावा भागातील सदनिकांचे मूळ मालक खोणीतील ग्रामस्थ गणेश ठोंबरे, के १७०४ कासा अद्रियाना सोसायटीतील सदनिका क्रमांक १७०४ चे घर मालक,
आद्रियाना १५०३ चे घर मालक, सदनिका क्रमांक १७०१, १५०२ चे घर मालक, ऑरिला सोसायटीतील फ ९०५ सदनिकेचे घर मालक, एम ४०२, कासा इलाईटे घर मालक, एल २०५ कासा उलबानोचे घर मालक, व्हाॅलेट सोसायटीतील ई ५११ घराचे मालक, कासा ऑरिलातील घर क्रमांक १९०१ चे घर मालक यांच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार प्रीतम काळे यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम २२३, सह परदेशी नागरिक कायदा १९४६ चे कलम (क), रजिस्ट्रेशन ऑफ फाॅरेन ॲक्ट्स १९३९ चे कलम ५, द इमिग्रेशन ॲन्ड फाॅरेन ॲक्ट २०२५ कलम २४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या २४ नायजेरियन नागरिकांमध्ये १३ पुरूष, ७ महिला, ३ अल्पवयीन मुले, १ अल्पवयीन मुलगी यांचा समावेश आहे.
पाॅल तस्कर फरारच
नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या पाॅल चिगबटा ओन्हुआ उर्फ एझे चिगबटा या नायजेरियन नागरिका विरूध्द गुन्हा दाखल आहे. वाशी पोलीस पाॅल तस्कराचा शोध घेत आहेत. नायजेरियन नागरिक डोंबिवली जवळील खोणी पलावा भागात राहत असल्याची माहिती मिळाल्यावर पाॅल खोणी पलावा भागात राहतो की काय याचा माग काढण्यासाठी नवी मुंबई आणि मानपाडा पोलिसांनी खोणी पलावा भागातील गृहसंकुलात अचानक धरपकड मोहीम राबवली.
याठिकाणाहून २४ नायजेरियन नागरिक ताब्यात घेतले. यामधील आठ जणांकडे भारतात वास्तव्याची व्हिजा, पारपत्र आहेत. उर्वरित नायजेरियन नागरिकांची पारपत्रे, व्हिजा विविध गुन्ह्याने न्यायालयात जमा असल्याची माहिती पोलिसांना तपासातून मिळाली. या धरपकड मोहिमेत वाशी पोलिसांना हवा असलेला नायजेरियन नागरिक सापडला नाही.
माहिती लपवली
परदेशी नागरिकांना घर भाड्याने देताना भारत सरकारच्या संकेतस्थळावर घर मालकांनी सी अर्ज भरणे बंधनकारक आहे. तसेच ही माहिती स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे. तरीही खोणी पलावातील घर मालकांनी आपली घरे नायजेरियन नागरिकांना कायदेशीर कोणत्याही प्रक्रिया पार न पाडता भाड्याने दिली म्हणून पोलिसांनी ११ घर मालकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. कल्याण, डोंबिवलीत परदेशी नागरिकांना घरे भाड्याने देणाऱ्या घर मालकांविरूध्द प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
