डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील कोपर ९० फुटी रस्त्यावरील म्हाळसाई चाळ भागातील पालिका निवडणूक काळात गेल्या महिनाभराच्या कालावधीत उभारण्यात आलेल्या एकूण ७२ बेकायदा चाळी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त अभिनव गोयल आणि ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी जमीनदोस्त कराव्यात. या मागणीसाठी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने गेल्या पाच दिवसांंपासून मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाची दखल घेत ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी देवीचापाडा भागातील बेकायदा चाळी दोन दिवसापूर्वी जमीनदोस्त केल्या. तसेच, टेलकोसवाडीतील एका निर्माणाधिन इमारतीची या इमारतीला नगररचना विभागाने दिलेल्या दोन मुदतवाढी, इमारत उभारणी बदलातील सुधारित बांधकाम परवानगी अशी नगररचना विभागाकडून सर्वंकर्ष माहिती प्राप्त झाली की याप्रकरणी आपण पालिकेकडून संबंधितांवर कारवाईची मागणी करणार आहोत. पालिकेकडून कारवाई झाली नाहीतर मुंबई उच्च न्यायालयात या इमारत प्रकरणी याचिका दाखल करणार आहोत, असे उपोषणकर्ते जोशी यांनी सांगितले.
या इमारतीची उभारणी करणारा विकासक हा ६५ महारेरा बेकायदा इमारत गुन्हा प्रकरणातील सहभागी आहे. डोंबिवलीत सर्वाधिक बेकायदा इमारती उभारणीत या विकासकाचा सहभाग आढळून आला आहे. त्यांच्यावर एमआरटीपीचे गुन्हे दाखल आहेत ही माहिती आपण उच्च न्यायालयात याचिकेच्या माध्यमातून देणार आहोत, असे उपोषणकर्ते जोशी यांनी सांगितले.
पर्यावरणाचा ऱ्हास करून चाळी
या उपोषणाच्या दणक्यामुळे ह प्रभाग अधिकारी सावंत यांनी देवीचापाडा येथील बेकायदा चाळींवर शुक्रवारी कारवाई केली. अद्याप कोपर भागातील खाडी किनारा बुजवून, कांदळवन जंगल नष्ट करून उभारण्यात आलेल्या एकूण ७२ चाळींवर कारवाई झाली नसल्याने या सर्व बेकायदा चाळी जमीनदोस्त करा. तरच आपण उपोषण सोडू, अशी भूमिका उपोषणकर्ते कल्पेश जोशी यांनी घेतली आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेकडे तक्रारी करूनही ह प्रभाग अधिकारी आणि अतिक्रमण नियंत्रण पथकाकडून या बेकायदा चाळी तोडल्या जात नसल्याने या बेकायदा चाळींच्या विरूध्द तक्रारी करणाऱ्या तक्रारदाराने मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कोपर येथील बेकायदा चाळी जमीन मालक आणि काही स्थानिक राजकीय मंडळी यांनी एकत्रित येऊन उभारल्या आहेत. याप्रकरणातील एका राजकीय सहभागीवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात बेकायदा इमारत प्रकरणी गेल्या वर्षी गुन्हा दाखल झाला आहे.
कोपर भागातील बेकायदा चाळींवर कारवाई कशी करायची, याची आखणी करण्यासाठी सोमवारी सकाळी ह प्रभाग कार्यालयात बेकायदा चाळींसाठी जागा देणारा जमीन मालक आणि एक राजकीय भूमाफिया एका अधिकाऱ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते, अशी खात्रीलायक माहिती आहे. या चाळींंवर पालिकेकडून कारवाई केली जात नसल्याने आणि आयुक्तही या प्रभागातील अधिकाऱ्याची बदली करत नसल्याने तक्रारदार, पर्यावरणप्रेमी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

