कल्याण – मागील सहा महिन्यांपासून पाठपुरावा करूनही डोंबिवली पश्चिमेतील कोपरमधील बेकायदा चाळी तोडण्यास शासन आणि कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आक्रमक भूमिका घेत नसल्याने या प्रकरणातील तक्रारदार बंधूंनी आयुक्तांचे, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एकाचवेळी पालिकेच्या कल्याणमधील मुख्यालय आणि मुंबईत आझाद मैदान येथे बेमुदत उपोषणे सुरू केली आहेत. कल्पेश जोशी आणि विनोद जोशी अशी उपोषणकर्त्यांची नावे आहेत. शरीर भाजून टाकणाऱ्या रखरखीत उन्हात हे दोन्ही बंधू पर्यावरण संवर्धनाचा विचार करून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
डोंबिवली जवळील कोपर भागात कांदळवन नष्ट करून, खाडीत मातीचे भराव करून, या भागातील गवताचे हरितपट्टे नष्ट करून भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. तसेच, मागील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत कोपर भागातील इंदुबाई म्हात्रे चाळ, म्हाळसाई चाळ भागात भूमाफियांनी ८० हून अधिक बेकायदा चाळी उभारल्या आहेत. या बेकायदा चाळींमधील घरे पालिकेने कारवाई करू नये म्हणून चार ते पाच लाख रूपयांना विकून या बेकायदा चाळींमध्ये रहिवास निर्माण केला आहे.
या बेकायदा चाळींना पालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरून चोरून पाणी पुरवठा, काही ठिकाणी रात्रीच्या वेळेत चोरून वीज पुरवठा घेतला जात असल्याच्या तक्रारी आहेत. या बेकायदा चाळींमुळे कोपर परिसरातील कांदनळवन जंगल नष्ट झाले आहे. या भागातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बेकायदा चाळी पालिकेच्या ह प्रभाग अधिकारी, अतिक्रमण नियंत्रण पथकाच्या साहाय्याने तोडून टाकण्याची मागणी तक्रारदार कल्पेश आणि विनोद जोशी यांनी पालिका आयुक्त, शासनाचा नगरविकास विभाग, कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे केली आहे.
शासनाने वेळोवेळी पालिका आयुक्तांना पत्रे पाठवून कोपर येथील बेकायदा चाळी तोडण्याचे निर्देश दिले आहेत. पण पालिकेकडून या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात नाही. राजकीय दबावामुळे पालिका अधिकारी या भागात फिरकत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे या बेकायदा चाळी जमीनदोस्त झाल्याशिवाय आपण आपले बेमुदत उपोषण सोडणार नाही अशी ताठर भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत या बेकायदा बांधकामांची पाठराखण करत असल्याने आणि त्यांच्या निष्क्रियतेमुळे या बेकायदा चाळी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सावंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्या जोशी बंधूंनी केली आहे.
कडक उन्हात हे दोन्ही बंधू उपोषण करत असल्याने त्यांची ही उन्हात बसण्याची हिंमत पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. आणि पालिका अधिकाऱ्यांना या उपोषणकर्त्यांच्या तक्रारीविषयीचे गांभीर्य नसल्याने नागरिक चीडही व्यक्त करत आहेत. तसेच कोपर पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याचा खुराडा पालिकेच्या ह प्रभाग अतिक्रमण नियंत्रण पथकाकडून भुईसपाट केला जात नाही. हा खुराडा भुईसपाट करण्याची जोरदार मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.
