डोंबिवली – पालिकेच्या ह प्रभाग हद्दीतील कोपर पश्चिम रेल्वे स्थानका जवळ मागील तीन वर्षापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता भूमाफियांनी कोंबडीच्या खुराड्याच्या नावाने एक बेकायदा बांधकाम केले. राजकीय दबाव आणून त्यावेळी भूमाफियांनी हरितपट्ट्यावरील या बेकायदा बांधकामांवर कारवाई होऊ दिली नाही. गेल्या काही दिवसापूर्वी भूमाफियांनी या खुराड्याजवळील १०० बाय १०० लांबी रूंदीची जागा हरितपट्टा नष्ट करून त्यावर बेकायदा बांधकाम सुरू केले आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

गेल्या तीन वर्षापूर्वी बेकायदा बांधकाम करून उभारण्यात आलेला कोंबडीचा खुराडा आता विस्तारित करून त्या ठिकाणी नवीन बेकायदा बांधकाम केले जात आहे. या बेकायदा बांधकामासाठी विटा, भुसा आणून ठेवण्यात आला आहे. दिवसाढवळ्या एवढे मोठे काम सुरू असताना पालिका ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, अधीक्षक, बीट मुकादम, अतिक्रमण नियंत्रण पथकाला हे बेकायदा बांधकाम दिसत नाही का, असे प्रश्न काही तक्रारदार वकील, इतर तक्रारदारांनी केले आहेत. या खुराड्यावर पालिकेने कारवाई केली नाहीतर याप्रकरणी न्यायालयात आव्हान देण्याची तयारी एका वकिलाने केली आहे.

आयुक्त शांत

टिटवाळा, कल्याण पूर्वेतील चिंचपाडा आणि इतर भागातील बेकायदा बांधकामांविषयी आयुक्त अभिनव गोयल अधिक आक्रमक आहेत. मग, ते डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीत सुरू असलेल्या कोपर येथील म्हाळसाई चाळ, इंदु म्हात्रे चाळ परिसरातील ७० हून बेकायदा चाळी, सरोवरनगर भागातील २५० बेकायदा चाळी तोडण्याचे आदेश आयुक्त का देत नाहीत, असे प्रश्न तक्रारदार उपस्थित करत आहेत. या बेकायदा चाळींच्या विरोधात विनोद जोशी गेल्या पंधरा दिवसापासून आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.

हा बेकायदा बांधकामांचा विषय चिघळला असतानाच, कोपर पश्चिम रेल्वे स्थानकालगत भूमाफियांनी पालिका आयुक्त, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त, शासन आदेश, पर्यावरण संवर्धन विभागाला न जुमानता कोंबडीच्या खुराड्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू केले आहे. कोपर पश्चिम रेल्वे स्थानक भागात एकमेव हरितपट्टा शिल्लक आहे. तोही आता भूमाफियांनी बेकायदा बांधकामे करून, दुसऱ्या बाजुने वाळू माफियांनी रेती उपसा करून नष्ट करण्यास सुरूवात केली आहे. या बेकायदा बांधकामे आणि वाळू उपशामुळे मागील तीन ते चार वर्षापासून मुसळधार पाऊस पडला की कोपर भागातील वस्तीत खाडीचे पाणी शिरत आहे.

ह प्रभागात अनागोंदी

पालिकेच्या ह प्रभाग हद्दीत बेसुमार बेकायदा चाळींची बांधकामे सुरू आहेत. कोपर, देवीचापाडा गोपीनाथ चौक भागातील मोकळ्या जमिनींवर पालिकेचा महसूल बुडवून दर सोमवारी आठवडी बाजार भरविले जात आहेत. पालिकेच्या ह प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील कामगार या बाजार चालकांशी सलगी करत असल्याच्या आणि पालिकेचा महसूल बुडवत असल्याच्या तक्रारी आहेत. साहाय्यक आयुक्त सावंत यांना संपर्क केला. त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.