Dombivli Kopar illegal construction action: डोंबिवली पश्चिमेतील कोपर, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, सरोवरनगर उल्हास खाडी किनारचे कांंदळवनाचे घनदाट जंगल नष्ट करून तेथे बेकायदा चाळी उभारण्याची ठाणे जिल्हाधिकारी, राज्याच्या लोकायुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. कांदळवन नष्ट केल्या प्रकरणाची तातडीने चौकशी करून या भागातील गुरचरण, वन जमिनीवर उभारण्यात आलेल्या सर्व बेकायदा चाळी विहित प्रक्रिया पूर्ण करून जमीनदोस्त करण्याच्या जोरदार हालचाली स्थानिक महसूल विभागाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून सुरू केल्या आहेत.
शास्त्रीनगर रुग्णालयातील डाॅक्टर हल्लाप्रकरणी चर्चेत आलेले शिंदे शिवसेनेचे कोपर प्रभागाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांच्या प्रभागात खाडी किनारी सर्वाधिक बेकायदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. या बेकायदा चाळींवर कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना वेळोवेळी स्थानिक दांडगटांनी दमदाटी करून पळवून लावले आहे. तीन वर्षापूर्वी ‘ह’ प्रभागातील एका साहाय्यक आयुक्ताने कोपर प्रभागातील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी स्थानिक नगरसेवकाने संबंधिताला जीवघेणी दमदाटी केली होती.
कांदळवन नष्ट होत असल्याची दखल
डोंबिवली पश्चिमेत कोपर, मोठागाव, देवीचापाडा, कुंभारखाणपाडा, गणेशनगर पाच ते सहा किमी लांबीचा एकमेव कांदळवनाचा हरितपट्टा आहे. गेल्या २० वर्षात भूमाफियांनी स्थानिक राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने या भागात कांदळवनाचे जंगल नष्ट करून तेथे बेकायदा चाळी उभारल्या. या सहा किमीच्या खाडी किनारा पट्ट्यात १० हजाराहून अधिक बेकायदा चाळी उभ्या आहेत. या बेकायदा चाळींमुळे जैवविविधता नष्ट झाली आहे.
पर्यावरणप्रेमी संस्थांनी हे कांदळवन जंगल संवर्धनासाठी या भागातील मोकळया जागेत खारफुटीची लागवड करण्याची मोहीम हाती घेतली होती. स्थानिक जमीन मालक, भूमाफिया, राजकीय मंडळींनी दादागिरी करून पर्यावरणप्रेमींचे कांदळवन संवर्धनाचे प्रयत्न हाणून पाडले.
जिल्हा प्रशासनाची दखल
डोंबिवलीतील हरितपट्टा नष्ट केल्याने पर्यावरण संवर्धनाचा विचार करून ‘लोकसत्ता’ सहदैनिकाने सातत्याने या बेकायदा चाळी, कांदळवन जंगल नष्ट होण्याकडे बातम्यांच्या माध्यमातून पालिका, शासनाचे लक्ष वेधले होते. त्याची गंभीर दखल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. या बेकायदा चाळी आणि तेथील कांदळवन नष्ट केल्या प्रकरणाची चौकशी करून गुरचरण, वन जमिनीवरील सर्व बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याचे आदेश कल्याणचे तहसीलदार, वन, भूमिअभिलेख विभाग, कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन यांना दिले आहेत.
या आदेशाप्रमाणे पालिका, महसूल, भूमिअभिलेख, वन, कांदळवन संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात डोंबिवलीत कोपर, देवीचापाडा, सरोवरनगर, कुंभारखाणपाडा भागात येऊन पाहणी केली. या कांदळवन नष्ट केल्याच्या, त्यावर बेकायदा चाळी उभारण्यात आलेल्या गुरचरण, वन जमिनीची भूमिअभिलेख विभागाच्या माध्यमातून मोजणी करून, या सरकारी जागांची निश्चिती करायची. सरकारी जमिनीवरील बेकायदा चाळी महसूल विभागाच्या नियोजनाप्रमाणे पालिका प्रशासनाच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्याच्या हालचाली आहेत.
लोकायुक्तांकडून दखल
तक्रारदार कल्पेश जोशी यांनीही राज्याच्या लोकायुक्तांकडे डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरातील हरितपट्टा नष्ट करून उभारलेल्या २७० बेकायदा चाळींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी लोकायुक्तांकडून स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
कांदळवन नष्ट करून त्यावर बांधकाम केल्याप्रकरणी कोपर, देवीचापाडा, सरोवरनगर परिसराची वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे पाहणी करण्यात आली. या भागाची वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जमीन मोजणी करून गुरचरण, वन जमिनी निश्चिती करून या जमिनींवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन आहे.
- रवींद्र जमदरे मंडळ अधिकारी, डोंबिवली.
डोंबिवली पश्चिमेतील कोपर, देवीचापाडा परिसरातील कांदळवन नष्ट करून सरकारी जमिनीवर उभारलेल्या बेकायदा चाळी महसूल, वन विभाग आणि पालिका यांच्या एकत्रित कारवाईतून तोडण्याचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे. अनेक वर्षापू्र्वीच्या या चाळी आहेत.
- अभिमान पवार, साहाय्यक आयुक्त, ‘ह’ प्रभाग. डोंबिवली.
