डोंबिवली – डोंबिवली शहराच्या विविध भागात गेल्या १५ ते २० वर्षात कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता बेसुमार बेकायदा इमारती उभारणारा सराईत भूमाफिया प्रफुल्ल मोहन गोरे याला विष्णुनगर पोलिसांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या ह प्रभाग हद्दीतील कोपर भागातील एका बेकायदा इमारत प्रकरणी अटक केली आहे. मागील तीन दिवसांपासून तो पोलीस कोठडीत आहे.

डोंबिवली शहरातील बेकायदा बांधकामांचा म्होरक्या म्हणून प्रफुल्ल गोरेची ओळख आहे. गोरे याने यापूर्वी शहराच्या कुंभारखाणपाडा, दावडी, कोपर, नवापाडा, शिवमंदिर भागात बेकायदा इमारती उभारल्या. काही इमारती पालिकेने भुईसपाट केल्या. ज्येष्ठ माहिती कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी प्रफुल्ले गोरे याच्या डोंबिवलीतील विविध बेकायदा इमारत प्रकरणी पालिकेत, शासनस्तरावर तक्रारी केल्या आहेत. या बेकायदा इमारतींना चोरून पाणी पुरवठा, चोरून वीज पुरवठा घेतल्याप्रकरणी निंबाळकर यांनी पालिका, महावितरणकडे अनेक तक्रारी केल्या आहेत.

अटकेचे कारण काय

डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागातील सखारामनगर काॅम्पलेक्स भागात स्वामी समर्थ मठासमोर ऑक्टोबर २०२१ पूर्वी जमीन मालक काळ्या कृष्णा जोशी (७०), बांधकामधारक भूमाफिया सुरज ज्ञानेश्वर बुट्टे आणि आदित्य बिल्डकाॅनचे मालक भूमाफिया प्रफुल्ल मोहन गोरे आणि वास्तुविशारद मे. वास्तु रचना यांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता, पालिकेच्या नगररचना विभागातील बांधकाम परवानगीची बनावट कागदपत्रे तयार करून शिव आराधना नावाची एक सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली. ही बेकायदा इमारत अधिकृत आहे असे घर खरेदीदारांना दाखवून त्यांची फसवणूक केली. या बेकायदा इमारतीच्या माहिती कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी पालिककडे तक्रार केली. पालिकेच्या ह प्रभागाने या तक्रारीची दखल घेतली. शिव आराधना इमारतीमधील भूमाफिया सुरज बुट्टे, प्रफुल्ल गोरे यांना या इमारतीची बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली.

बुट्टे याने २१ जुलै २०२१ रोजी नगररचना विभागाने दिलेली बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्राची मंजुरी सुनावणीच्यावेळी ह प्रभागात दाखल केली. ही परवानगी ह प्रभागाने नगररचना विभागात पडताळणी केली. अशी कोणतीही बांधकाम परवानगी बुट्टे यांना कोपरमध्ये दिली नसल्याचे नगररचना विभागाने स्पष्ट केले.

पालिकेची बांधकाम मंजुरीची बनावट कागदपत्रे तयार केली. त्यावर अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्के मारले म्हणून पालिकेने ही इमारत अनधिकृत घोषित केली. ही इमारत तातडीने जमीनदोस्त करण्याची नोटीस भूमाफियांना बजावली. या नोटिसीला न जुमानता बुट्टे, गोरे यांनी बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण केले. ह प्रभागाचे अधीक्षक अरूण पाटील यांनी १० जून २०२५ रोजी विष्णुनगर पोलीस ठाण्यात भूमाफिया बिल्डर सुरज बुट्टे, कुलमुखत्यार प्रफुल्ल गोरे, जमीन मालक काळ्या कृष्णा जोशी यांच्या विरूध्द भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४, ४२०, ४७१, ४४, ४६५, ४६८, महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाच्या चौकशीत पोलिसांनी गोरेला अटक केली आहे. गोरेची कोठडीची मुदत शनिवारी संपत आहे. ६५ बेकायदा इमारत प्रकरणात गोरेचा सहभाग आहे.

अखेर अटक

गुन्हा दाखल होताच भूमाफिया गोरे अटक टाळण्यासाठी न्यायालयात प्रयत्नशील होता. न्यायालयाने त्याचा जामीन गेल्या वर्षीच फेटाळला होता. अखेर गोरेला विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी अटक केली. एमआरटीपीच्या गुन्हात एका भूमाफियाला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुरज बुट्टे याला अटक केली की बेकायदा बांधकामातील सर्व व्यवहार बाहेर येणार आहेत. त्यालाही अटक करण्याची घर फसवणूकदारांची मागणी आहे. कल्याण, डोंबिवलीत एकूण ४०० हून अधिक भूमाफिया आहेत. आपणास त्रास देणाऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याची या भूमाफियांची पध्दत आहे.