डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथावरील म्हात्रेनगर भागात एका लॉन्ड्री व्यावसायिकाच्या दुकानात सकाळी साडे सहा वाजता घुसून तीन तरूणांनी शिवीगाळ करत लॉन्ड्री व्यावसायिकाला ठोशाबुक्क्यांनी आणि हातामधील साधनाने बेदम मारहाण केली. पतीच्या बचावासाठी लॉन्ड्री व्यावसायिकाची पत्नी मध्ये पडली तर या झटापटीत तिचे मंगळसूत्र गहाळ झाले. व्यावसायिकाच्या भावालाही या त्रिकुटाने कमरेच्या पट्टयाने मारहाण केली.

या तरूणांच्या या दहशतीने परिसरात तीव्र नाराजी नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील अनेक वर्षापासून लॉन्ड्री व्यावसायिक कृष्णा कनोजिया (४२) म्हात्रेनगरमध्ये कृष्णा पॉवर लॉन्ड्री नावाने व्यवसाय करतात. ते कुटुंबीयांसह राहतात. कृष्णा यांना मारहाण करणाऱ्या तरूणांमध्ये अथर्व मांजरेकर, सुनील ताम्हणकर, सुयेश वीर यांचा समावेश आहे.

कृष्णा कनोजिया यांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार अशी, की सोमवारी सकाळी आपण आपल्या म्हात्रेनगरमधील लॉन्ड्रीत काम करत होतो. यावेळी दुकानाच्या बाहेर आपल्या तोंड ओळखीचा अथर्व मांजरेकर आला. त्याने आपणास बाहेर येण्यासाठी मोठ्याने ओरडून सांगितले. ‘तु फक्त बाहेर ये, तुला मी सांगतो’ असे अथर्व बोलत होता. अथर्व आपणास मारहाण करील या विचाराने आपण लॉन्ड्री बाहेर गेलो नाही.आपण दुकानाच्या बाहेर जात नाही हे लक्षात आल्यावर गुन्हा दाखल तरूण अथर्व मांजरेकर, सुनील ताम्हणकर, सुयेश वीर झुंडीने आपल्या दुकानात घुसले. त्यांनी शिवीगाळ करत आपणास ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

आपणास मारहाण होत असताना आपली पत्नी आपल्या बचावासाठी पुढे आली तर या झटापटीच्या वेळी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले. अथर्व मांजरेकर याच्या हातामध्ये असलेल्या एका साधनाने त्याने आपणास मारहाण केल्याने आपल्या हात आणि पोटाला दुखापत झाली. आपणास हे त्रिकुट मारत असल्याने बचावासाठी लाॅन्ड्री व्यावसायिक कृष्णा यांनी आपला भाऊ दुर्गेश्वर यांना दुकानात बोलावून घेतले. ते तातडीने दुकानात आले. यावेळी ते बचावासाठी मध्ये पडले तर त्यांनाही त्रिकुटाने पट्ट्याने मारहाण केली. आपणास मारहाण केल्यानंतर हे तिघे जण निघून गेले.

त्यानंतर आपण पत्नीसह रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलो. तेथून वैद्यकीय तपासणीचे पत्र घेऊन आपण पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात जात होतो. त्यावेळी आपण अथर्व मांजरेकर याने ‘तुम्ही आमच्या विरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार केली तर तुम्हाला मी मारीन’ अशी धमकी दिली. या तिघा जणांकडून जीवाला धोका असल्याने कृष्णा कनोजिया यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रामनगर पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.आपल्या लॉन्ड्री व्यावसायिकाला मारहाण झाल्याने परिसरातील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. आणि मारहाण करणाऱ्या त्रिकुटावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.