डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील बापूसाहेब फडके रस्त्यावरील छेद रस्त्यावर एचडीएफसी बँकेसमोरील लक्ष्मी सागर या धोकादायक इमारतीचा सज्जा सोमवारी रात्री कोसळला. हा रस्ता वाहन वर्दळीसाठी बंद असल्याने जीवित हानी टळली. सज्ज्याचा राडारोडा रस्त्याच्या बाजुला पडला. या इमारतीत दोन कुटुंब राहत होती. त्यांना पालिका अग्निशमन पथकांनी तातडीने बाहेर काढले. या इमारतीत टपाल कार्यालय आहे.

इमारतीचा सज्जा कोसळल्याने मोठा आवाज झाला. इमारतीच्या निवाऱ्याचे छत काही ठिकाणी तुटले. सज्जा कोसळताच आता इमारत कोसळणार म्हणून परिसरात घबराट पसरली. आजुबाजुच्या दुकानदारांनी तातडीने दुकाने बंद करून तेथून पळ काढला. ही माहिती मिळताच पालिकेच्या फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकूर आपल्या आपत्कालीन पथकासह तातडीने घटनास्थळी आले. यावेळी ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार उपस्थित होते.

अग्निशमन पथकाने या इमारतीमधील कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाहेर काढले. या इमारतीच्या भोवती संरक्षित कठडे लावून या इमारत परिसरात कोणीही जाऊ नये असे अडथळे उभे केले. या इमारतीमधील टपाल कार्यालयासंदर्भात मंगळवारी पालिका आणि टपाल कार्यालयाकडून एकत्रित निर्णय घेण्यात येणार आहे.

लक्ष्मी सागर ही चाळीस वर्षापूर्वीची इमारत आहे. या इमारतीत एकूण १८ कुटुंब होती. त्यामधील दोन कुटुंब येथे राहत होती. तळ मजल्याला सोळा गाळे आहेत. त्यामध्ये व्यापारी आस्थापना, केळीची भट्टी आहे. पालिकेच्या धोकादायक इमारतीमध्ये या इमारतीचा समावेश नाही, असे ठाकूर यांनी सांगितले. लक्ष्मी सागर इमारती समोरील रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. परंतु, या इमारती शेजारील पंडित नेेहरू रस्त्याच्या सीमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे लक्ष्मी सागर समोरील रस्ता वाहनांसाठी, प्रवाशांसाठी बंद आहे. सज्जा कोसळताना जीवित हानी झाली नाही.

या इमारतीमधील कुटुंबे आपल्या नातेवाईकांकडे रहिवासासाठी जाणार आहेत. ही इमारत टपाल कार्यालयाची इमारत म्हणून ओळखली जात होती. अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या कामासाठी दररोज सकाळपासून दुपारपर्यंत या इमारतीत येत होते. दिवसभरात हा प्रकार घडला असता तर जीवित हानी झाली असती, असे परिसरातील रहिवासी, व्यापाऱ्यांनी सांगितले.

लक्ष्मी सागर इमारत ४० वर्षापुर्वीची इमारत आहे. या इमारतीचे मंगळवारी संरचनात्मक अंकेक्षण करून आम्ही या इमारतीचा कोसळलेला भाग वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे अग्निशमन पथक, आपत्कालीन पथकाच्या साहाय्याने तोडण्याचा विचार करत आहोत. या इमारतीमुळे अन्य कोणाला धोका पोहचू नये याची तात्पुरती खबरदारी घेतली आहे. – प्रसाद ठाकूर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.