डोंबिवली – मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रनगर मधील दोन पाण्याची टाकी, शिवसेना शाखा ते योग संकुल दरम्यानचा सुमारे दीड हजार मीटर लांबीचा सीमेंट काँक्रीट रस्ता मागील दोन वर्षापासून संथगती, रडतखडत सुरू आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठीचा हा मधला मार्ग मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने या भागासह परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. हा रस्ता पाऊस सुरू होण्यापूर्वी खुला करावा, अन्यथा या भागातील रहिवासी या भागात आंदोलन आणि उपोषण करतील, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे.
कल्याणमधील एका नगरसेवकाच्या ठेकेदाराने हे काम हाती घेतले आहे. या ठेकेदाराकडे रस्ते काम पूर्ण करण्याची पुरेशी यंत्रणा नाही. या भागातील रस्त्याच्या रूंदीकरण न करता आहे त्या स्थितीत विकास आराखड्याचा विचार न करता हा रस्ता रेटून सीमेंट काँक्रिटचा करण्यात आला आहे. मागील दोन वर्षापासून टप्प्याने ही कामे सुरू आहेत. अतिशय संथगतीने, रडतखडत ही कामे सुरू असल्याने परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. नागरिकांना वळसा घेऊन घरचा रस्ता गाठावा लागतो. मागील काही महिन्यांपासून या भागात रिक्षा, रुग्णवाहिका आणि इतर कोणतेही वाहन येत नाही. या भागातील अनेक रहिवाशांची वाहने आपल्या सोसायटीत रस्ते कामामुळे सोसायटीत अडकून पडली आहेत. या भागात काही दुर्घटना घडली तर अग्निशमन वाहन या भागात अवघड आहे.
दीड हजार मीटर लांबीचा हा सीमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यासाठी ठेकेदार दोन वर्ष घेत असेल तर आयुक्तांनी या कामाच्या ठेकेदाराची चौकशी सुरू करावी. परीक्षांच्या काळात हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. पालक, विद्यार्थ्यांना दोन पाण्याची टाकी येथे येऊन मग बस, रिक्षेने शाळेत जावे लागत होते. महाराष्ट्रनगरमधील नोकरदारवर्गही या रखडलेल्या रस्त्यामुळे त्रस्त आहे. या विषयी उघडपणे बोलले तर तात्काळ काही राजकीय मंडळी दबावतंत्राचा वापर करून संबंधितांना गप्प करतात, अशा तक्रारी आहेत.
उपोषणाची तयारी
महाराष्ट्रनगरमधील अनेक रहिवाशांनी या भागातील भाजपचे कार्यकर्ते अनमोल म्हात्रे, अश्विनी म्हात्रे यांची भेट घेतली. महाराष्ट्रनगरमधील रडतखडत सुरू असलेला रस्ता पावसाळ्यापूर्वी सुरू व्हावा यासाठी प्रयत्न करा. अन्यथा आपल्या पुढाकाराने आपण पालिकेसमोर उपोषण करू, अशी गळ घालून उपोषणाची तयारी करण्याची सज्जता केली आहे. नागरिकांची ही मागणी विचारात घेऊन भाजप कार्यकर्ते अनमोल म्हात्रे, अश्विनी म्हात्रे यांनी मंगळवारी पालिकेच्या ह प्रभाग कार्यालयात जाऊन उपअभियंता अजय महाजन यांच्या नावाने एक पत्र दिले. महाराष्ट्रनगरमधील रस्ता तातडीने खुला करण्याची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यात आली नाहीतर मात्र या भागातील नागरिकांच्या पुढाकाराने आपण पालिकेसमोर उपोषण सुरू करू, असे अनमोल म्हात्रे यांनी सांगितले.
शहराच्या इतर भागातील सीमेंट रस्ते झटपट पूर्ण केले जात आहेत. महाराष्ट्रनगरमधील रस्त्याला कसली नड लागली आहे, हे एकदा आयुक्त, शहर अभियंत्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहावे. हा रस्ता पावसाळ्यापूर्वी सुरू करावा. अन्यथा या भागातील रहिवासी या संथगती रस्त्याच्या विरोधात उपोषण करतील. – अनमोल म्हात्रे भाजप कार्यकर्ते, महाराष्ट्रनगर.
