डोंबिवली – डोंबिवली पूर्व बाजीप्रभू चौकात अनेक वर्षापासून महावितरणचे वीज देयक भरणा केंद्र आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, रेल्वे स्थानकाजवळ हे वीज देयक भरणा केंद्र असल्याने डोंबिवली शहराच्या विविध भागातील ग्राहक या वीज देयक भरणा केंद्राला देयक भरण्यासाठी पसंती देतात. मागील काही महिन्यांपासून या वीज देयक भरणा केंद्रात पंखे नसल्याने प्रवाशांना घामाघूम होत वीज देयके भरावी लागतात.
सकाळपासून ते दुपारपर्यंत हे वीज देयक भरणा केंद्र ग्राहकांच्या रांगांनी भरून गेलेले असते. वीज देयक भरणा करण्यासाठी विशेषता ज्येष्ठ नागरिक, वृध्द, महिला वर्ग अधिक संख्येने येतो. आता कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. रस्त्याने चालताना पादचारी घामाने भिजून जात आहे. अशापरिस्थितीत बाजीप्रभू चौकातील या वीज देयक भरणा केंद्रावर निवारा म्हणून पत्रे आहेत. हे पत्रे उन्हाने गरम होतात. आणि त्याच्या गरम झळा या निवाऱ्या खाली देयक भरणा करण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाशांना बसतात. प्रवासी बटाट्यासारखे या निवाऱ्याखाली वाफळून निघत आहेत.
एक वीज देयक भरणा करण्यासाठी वीज देयक केंद्र चालकाला यंत्रावर सुमारे पाच ते सहा मिनिटे लागतात. एकावेळी रांगेत ५० ते ६० ग्राहक असले की तेवढा वेळ ग्राहकांना रांगेत उभे राहावे लागते. अनेक ग्राहक महावितरणच्या बाजीप्रभू चौकातील अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन वीज देयक भरणा केंद्राच्या ठिकाणी पंखे लावा म्हणून आर्जव करत आहेत. त्यावेळी तेथील अधिकारी हे काम आमचे नाही. ते दुसऱ्या अधिकाऱ्याचे आहे. ते तिसऱ्या अधिकाऱ्याचे आहे, असे सांगून ग्राहकांची बोळवण करत असल्याच्या तक्रारी आहेत. एकही अधिकारी याविषयी सत्य माहिती देत नाही, असे एका ग्राहकाने सांगितले.
महावितरण लाखो रूपयांची वीज देयक ग्राहकांकडून बाजीप्रभू चौकातील वीज देयक भरणा केंद्रातून भरणा करून घेते. आणि तेथे ग्राहकांना साधी पाणी पिण्याची, पंख्यांची सुविधा करून देत नसल्याने ग्राहक नाराजी व्यक्त करत आहेत. यापूर्वी या वीज देयक भरणा केंद्र निवाऱ्याच्या ठिकाणी पंखे होते. परंतु, या भागात महावितरणने निवाऱ्याचे नुतनीकरण केले आणि त्या भागातील पंखे नंतर काढून टाकण्यात आले. ते पुन्हा बसविण्यात आले नाहीत, असे काही जु्न्या ग्राहकांनी सांगितले.
घरून आणला पंखा
वीज देयक भरणा केंद्रातील कर्मचाऱ्यांना अनेक ग्राहक महावितरणच्या अधिकाऱ्यांना आपण निवारा भागात पंखे बसविण्यास सांगा, अशी मागणी करत आहेत. यावेळी वीज देयक केंद्रातील कर्मचारी आम्हीच आमच्या डोक्यावरील पंखे घरून स्वखर्चातून आणून बसवून घेतले आहेत. त्यामुळे बाहेर पंखे बसविण्याचा विषय आमच्या अखत्यारित आहेत. आमचे कोणी येथे ऐकत नाही, अशी उत्तरे वीज देयक केंद्रातील कर्मचारी देत आहेत. सर्वाधिक वीज देयक वसुली डोंबिवलीत होते. अशा परिस्थितीत वीज देयक भरणा नियमित करणाऱ्या ग्राहकांना महावितरण गारेगार पंख्याची सुविधा उपलब्ध करून देत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकारी, जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
