डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी पालिका निवडणूक कामात व्यस्त आहेत. याचा गैरफायदा घेत भूमाफियांनी डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा स्मशानभूमी, अनमोलनगरी, मेंग्या आजो मंदिर, जगदंबा माता मंदिर परिसरात बेकायदा चाळी उभारल्या. या बेकायदा चाळींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी गेल्या आठवड्यात ह प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते.

निवडणुकीमुळे या चाळींवर कारवाई झाली नाही. या चाळींचे प्रकरण ताजे असतानाच ह प्रभाग हद्दीतील कोपर खाडी किनारी भागात कांदळवन नष्ट करून भूमाफियांनी साठहून अधिक बेकायदा चाळींची महिनाभरात उभारणी केली आहे. डोंबिवली पश्चिमेत कोपर खाडी किनारा, देवीचापाडा, मोठागाव, कुंभारखाणपाडा, गणेशनगर परिसर हा एकमेव खारफुटीच्या जंगलाचा (कांदळवन) पट्टा शिल्लक आहे.

या भागातील ८० एकर जमिनीवर गेल्या दहा वर्षात पाच हजार बेकायदा चाळी पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने भूमाफियांनी उभारल्या आहेत. या बेकायदा चाळी उभारताना खारफुटीचे जंगल नष्ट करण्यात आले. गेल्या महिनाभरात पालिका निवडणूक काळात देवीचापाडा स्मशानभूमी परिसरात भूमाफियांनी या भागातील सरकारी जमिनी हडप करून, खारफुटीचे जंगल नष्ट करून बेकायदा चाळी उभारल्या आहेत. या बेकायदा चाळी आता रहिवास योग्य करण्यात आल्या आहेत. चाळीतील एक खोली तीन ते पाच लाखापर्यंत विकली जात आहे.

आयुक्त आदेश दुर्लक्षित

ह प्रभागात देवीचापाडा स्मशानभूमी परिसरात दार गणेश विसर्जन तलाव बुजवून बेकायदा चाळी भूमाफियांकडून उभारल्या जात आहेत. ही माहिती समजल्यावर आयुक्त अभिनव गोयल यांनी ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना देवीचापाडा परिसरातील बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. निवडणूक कामामुळे ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना चाळी तोडण्यास वेळ मिळाला नाही. या कालावधीत भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारून रहिवासासाठी सुसज्ज केल्या आहेत.निवडणुका होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला तरी ह प्रभाग अतिक्रमण नियंत्रण पथकाकडून या बेकायदा चाळींवर कारवाई होत नसल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक, तक्रारदार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

कोपरचे खारफुटी जंगल नष्ट

डोंबिवली पश्चिमेत कोपर खाडी किनारा भागात गणेशघाट ते माणकोली पुलापर्यंत खारफुटी जंगलाचा एकमेव हरितपट्टा शिल्लक आहे. भूमाफियांनी कोपर खाडीत भराव टाकून बेकायदा चाळी उभारणीचे काम सुरू केली आहेत. महिनाभरात ६० बेकायदा चाळी पालिका निवडणुकीच्या कालावधीत महिनाभराच्या कालावधीत भूमाफियांनी कोपर उभारल्या आहेत, असे तक्रारदार कल्पेश जोशी यांनी सांगितले. घर खरेदीदारांची फसवणूक करून भूमाफिया या चाळीतील खोल्यांची विक्री सुरू केली आहे.

महसूल विभागाची पाहणी

देवीचापाडा स्मशानभूमी परिसर, कोपर भागात सरकारी जमिनीवर सुरू असलेल्या बेकायदा चाळींची पाहणी करून या चाळी जमीनदोस्त करण्याची कार्यवाही केली जाईल, असे डोंबिवली महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘पालिका निवडणुकीमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण होता. त्यामुळे कारवाईस थोडा उशीर झाला. डोंबिवली पश्चिमेत ह प्रभागात सुरू असलेली अनधिकृत चाळींची बांधकामे जमीनदोस्त केली जातील. यासंदर्भात आपण तसे संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करतो.’ – समीर भूमकर उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण.