डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर उल्हास खाडीवरील माणकोली पुलावरील रस्त्यावर ॲक्टिव्हा दुचाकीवर बसून जीवघेणी स्टंटबाजी करत दुचाकी चालविणाऱ्या आणि इतर वाहन चालक, प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील तीन तरूणांना विष्णुनगर पोलिसांनी त्यांच्या वाहनासह अटक केली आहे. या तिन्ही तरूणांवर पोलिसांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हे वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

गणेश राजू फोंडारेड्डी (२२, रा. ठाकुरवाडी, राममंदिराजवळ, डोंबिवली), कबीर मच्छिंद्र नेतकर (२२०, रा. टेल्कोसवाडी, डोंबिवली), यश नितेश मालवणकर (२३,सायली निवास सोसायटी, डोंबिवली पश्चिम) अशी दुचाकीवर स्टंटबाजी करणाऱ्या तरूणांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांनी माणकोली उड्डाण पुलावर थार वाहन आणि इतर वाहने घेऊन रात्रीच्या वेळेत जीवघेणी थरारक पध्दतीने वाहने चालवून, इतर प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा पध्दतीने वाहने चालवणाऱ्या पाच जणांवर कारवाई केली होती. या थरारक जीवघेण्या वाहन चालविण्याच्या दृश्यांची या तरूणांनी दृश्यचित्रफित तयार करून ती समाज माध्यमांवर प्रसारित केली होती.

विष्णुनगर पोलिसांनी अशापध्दतीने जीवघेण्या पध्दतीने वाहने चालविणाऱ्या या मोटार चालकांचा मोठागाव, ठाकुरवाडी भागात शोध घेऊन त्यांना अटक केली होती. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. पुन्हा असा प्रकार केला तर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

दुचाकीवरून थरार

खाडीवरील माणकोली उड्डाण पूल हा सुमारे १२०० मीटर लांबीचा सरळ चार पदरी मार्ग आहे. डोंबिवलीतून मुंबई, ठाण्याकडे आणि ठाण्याकडून डोंबिवलीत होणारी बहुतांशी वाहतूक याच मार्गाने होते. त्यामुळे प्रवासी या मार्गाला पसंती देतात. मंगळवारी एका ॲक्टिव्हा दुचाकीवर नियमबाह्यपणे तीन तरूण बसून ती दुचाकी भरधाव वेगात, आडवीतिडवी आणि वेगवेगळ्या पध्दतीने थरारक पध्दतीने चालवून या जीवघेणी चालविण्याची पध्दतीची चलतचित्र (रील) बनवत होते. माणकोली उड्डाण पुलाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे भरधाव वेगात इतर वाहन चालकांना हातवारे करत दुचाकी चालवत होते. हा प्रकार पाहून इतर प्रवासी, वाहन चालक घाबरले होते. हे दुचाकी स्वार वेगाने पुलाच्या कठड्याला धडकून खाडीत पडले तर मोठी दुर्घटना होण्याची भीती इतर प्रवासी व्यक्त करत होते. या टपोरी असलेल्या तरूणांनी आपल्यावर कोणाचे लक्ष नाही असा विचार करून तयार केलेली भरधाव वेगाची चलतचित्रफित (रील) समाज माध्यमांवर प्रसारित केली.

पोलिसांचे लक्ष

समाज माध्यमांवर प्रसारित झालेली भरधाव दुचाकीची चलतचित्रफित विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतील माणकोली उड्डाण पुलावरील आहे हे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे यांना समजताच, त्यांनी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे आणि पथकाला या चित्रफितीमधील तरूण वाहन क्रमांकावरून शोधण्याचे आदेश दिले. पोलीस पथकाने या तरूणांची ओळख पटवून त्यांना डोंबिवली पश्चिमेतील ठाकुरवाडी, टेल्कोसवाडी भागातून ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या तिन्ही तरूणांवर मोटार वाहन कायद्याने वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे.

माणकोली उड्डाण पुलावर कोणीही थरारक कृती करून वाहन चालविले तर त्या वाहन चालकावर कठोर कायदेशीर करण्याचा निर्णय विष्णुनगर पोलिसांनी घेतला आहे.