डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव माणकोली उड्डाणपुलावर रात्री ११ वाजता दारू पिऊन मोठ्याने ओरडा करीत धिंगाणा घालणाऱ्या व विष्णुनगर पोलिसांच्या गस्ती पथकाने शांत राहण्याचा सल्ला देऊनही त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जुनी डोंबिवली व कुर्ला येथील दोन इसमांविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौशल सुरेंद्र तांबडे (वय २२) व जितेंद्र हिरालाल बाबरिया (३१) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. ते कुर्ला येथील बीएमसी काॅलनीत एलबीएस मार्ग येथे राहतात. या दोघांविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्याचे हवालदार संजय थोरात यांनी गुन्हा दाखल केला.

हवालदार थोरात यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की शनिवारी रात्री आम्ही विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होतो. यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे, हवालदार भांगरे बरोबर होते. आमचे पोलीस वाहन माणकोली पुलावरून जात असताना दोन जण मोठ्या आवाजात ओरडत पुलावरून जात होते. रस्त्यावरून वाहनांची वर्दळ असल्याने आम्ही त्यांना बाजुने चालण्याची व ओरडा न करता शांत राहण्याची सूचना केली. मद्यपान केले असल्याने आपण शांतपणे घरी निघून जा, अशी सूचना पोलिसांनी या दोन्ही इसमांना केली.

याउलट या दोन्ही इसमांनी पोलिसांशी गैरवर्तन करून हुज्जत घातली. आपण सांगूनही हे दोन्ही इसम ऐकत नाहीत व रात्रीच्या वेळेत ते पुलावर आणखी गोंधळ घालण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात त्यांनी मद्य सेवन केले आहे की नाही हे तपासणीसाठी नेले. तेथून त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घातल्याच्या वर्तनामुळे पोलिसांनी महाराष्ट्र दारू प्रतिबंधक कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.