डोंबिवली : मोठागाव रेतीबंदर भागातील माणकोली उड्डाणपुलावर जाण्यासाठी व डोंबिवली शहरात येण्यासाठी वाहन चालक रेल्वे फाटक, कोपर ९० फुटी रस्त्याच्या मार्गाचा अवलंब करतात. मोठागाव रेल्वे फाटकातील खोळंबा, माणकोली पुलाच्या पर्यायी रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक पर्यायी रस्त्यांचा अवलंब करून इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. या वाहन चालकांच्या रोजच्या प्रकारामुळे माणकोली पूल परिसरातील पर्यायी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

माणकोली पुलावर जाण्यासाठी डोंबिवली शहरातील वाहन चालक कोपर उड्डाणपुलावर डावे वळण घेऊन शास्त्री नगर रस्ता मार्गे ९० फुटी नवीन कोपर रस्त्याने प्रवास करतो. अनेक वाहन चालक पंडित दीनदयाळ रस्ता रेतीबंदर चौकातून मोठागाव रेल्वे फाटकातून माणकोली पुलावर जातो. रेल्वे फाटकाजवळ अनेकदा खोळंबा होत असल्याने अलीकडे बहुतांशी प्रवासी कोपर उड्डाणपूल मार्गे ९० फुटी बाह्यवळण रस्त्याला प्राधान्य देतात. या मार्गावर रेल्वे फाटक लागत नसल्याने पुलावर प्रवाशांना वेळेत पोहोचता येते.

भिवंडी, मुंबई ठाणे परिसरातून माणकोली पुलावरून डोंबिवलीत येणारी वाहने रेल्वे फाटक मार्गे वा कोपर ९० फुटी रस्त्याने कोपर उड्डाणपुलाकडे जातात. रेल्वे फाटकातील खोळंबा व त्यामुळे होणारी वाहन कोंडी विचारात घेऊन अनेक वाहनचालक विशेषत: खासगी प्रवासी भाड्याची वाहने माणकोली उड्डाणपूल, मोठागाव भागातील मधले अरुंद रस्ते शोधून गल्लीबोळातून वाहने नेतात. त्यामुळे या वाहन चालकांना वाहतूक कोंडी टाळून रस्त्यावरून पुढे जाता येते.

माणकोली पुलावरून रेल्वे फाटकाकडे येणारी वाहने, माणकोली पुलाकडून कोपर उड्डाणपुलाकडे ९० फुटी रस्त्याने येणारी वाहने मोठागावमधील पाण्याच्या टाकीजवळ वळण घेतात. या वळणावर एकावेळी तिन्ही बाजुची वाहने समोरासमोर पुढे जाण्यासाठी येतात. या तिठ्यावर वाहतूक पोलीस नसल्यामुळे वाहन चालक वाहने पुढे नेण्यासाठी घाई करीत असल्याने तिठ्यावर वाहतूक कोंडी होते.

वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनचालक मोठागावमधील रेल्वे पुलाखालून अरूंद रस्त्याने, अंतर्गत गल्लीबोळातील रस्त्याने प्रवास करतात. वाहतूक कोंडी होत नसल्याने काही वाहनचालक नियमित या रस्त्यावरून येजा करत असल्याने आता या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पालिकेने हे रस्ते सुस्थितीत करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.

रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल लवकरच होणार म्हणून राजकीय मंडळी गेली दोन वर्षे डिंडिम वाजवत आहेत. परंतु, उड्डाणपुलाच्या कामासाठी कोणतीही हालचाल याठिकाणी दिसत नसल्याने स्थानिक भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रेल्वे मार्गावरील हा उड्डाणपूल मार्गी लागण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.