डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील रेल्वे स्थानकाजवळ महात्मा गांधी रस्त्यावरील त्रिमूर्ती सोसायटी इमारतीत सुरू असलेल्या मसाज सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी येथील मुन्नर अब्दुल शेख (31) या व्यवस्थापकाला अटक केली. या मसाज सेंटरमध्ये देहविक्रय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सेंटरवर भिवंडी येथील निजामपुरा पोलीस आणि विष्णुनगरचे पोलीस यांनी संयुक्तपणे छापा टाकूनचार तरुणींची सुटका केली.
पाच ते सहा वर्षांपासून कल्याण, डोंबिवलीतील गृहसंकुलांमध्ये आकर्षक नावे देऊन मसाज सेंटर चालवण्यात येत आहेत. तीन वर्षांत पोलिसांनी या सेंटरवर छापे टाकून अनेक अवैध व्यवसाय बंद पाडले. डोंबिवलीतील मसाज सेंटरबाबत दोन वर्षांपूर्वी ॲड. मंगेश कुसुरकर यांनी शासनाकडे तक्रार केली होती. या सेंटरमध्ये देहविक्रयव्यवसाय चालविला जात आहे, अशी गुप्त माहिती ठाणे सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस निरीक्षक ज्ञानोबा सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी ही माहिती भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास डगळे यांना दिली. या माहितीच्या आधारे बुधवारी रात्री साडे आठ वाजता बनावट ग्राहक पाठवून या सेंटरवर छापा टाकला.
पोलिसांनी मसाज केंद्रातून एकूण २२ हजार रूपये आणि व्यवस्थापकासह चार पीडित तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र आल्हाट यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत निजामपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, हवालदार एस. डी. घुगे, अंकिता भोईर, अनिल साप्ते, विष्णुनगरचे गौड, हवालदार सोनाली राठोड सहभागी झाले होते.
