डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील के.व्ही. पेंढारकर महाविद्यालय भागातील रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणारी एक वाहिनी गुरुवारी रात्री अचानक फुटली. हे पाणी रस्त्यावरून आणि आजुबाजुच्या नाल्यातून वाहू लागले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. रात्रीच्या वेळेत अचानक उग्र दुर्गंधी कोठून सुटली म्हणून नागरिकांनी घर परिसरात पाहिले तेव्हा त्यांना रासायनिक सांडपाण्याची वाहिनी फुटल्याचे निदर्शनास आले.
हे सांडपाणी रस्त्यावर आल्याने वाहने या साचलेल्या रासायनिक दुर्गंधीयुक्त पाण्यातून काही वाहन चालकांनी घातली. तर मोटार, दुचाकी स्वारांनी आपल्या वाहनात हे रासायनिक पाणी जाऊन इंजिन बंद पडण्याची भीती वाटली. त्यामुळे त्यांनी आपली वाहने पर्यायी रस्त्यावरून नेली. ही वाहिनी फुटल्याची माहिती एमआयडीसी भागातील जागरूक नागरिक राजू नलावडे आणि सहकाऱ्यांनी तातडीने एमआयडीसीच्या डोंबिवली विभागातील जलमल निस्सारण अधिकाऱ्यांना दिली.
हे अधिकारी तातडीने आपले दुरुस्ती पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले. या वाहिनीतून अति वेगाने सांडपाणी वाहून जाण्याची प्रक्रिया सुरू होती. या वाहिनीतील सांडपाण्याचा वेग कमी होत नाही तोपर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेणे दुरुस्ती पथकाला शक्य नव्हते. रात्री अडीच वाजता या सांडपाणी वाहिनीचा प्रवाह खंडित करून, वाहिनीतील सांडपाण्याचा ओघ कमी झाल्यावर पथकाने दुरुस्तीचे काम सुरू केले.
या सांडपाणी वाहिनीच्या भागात गटाराचे काम सुरू आहे. या गटारासाठी खोदकाम करताना अवजाराचा फटका या जलवाहिनीला लागला असावा. हळुहळू हे फटका बसलेले वाहिनीवर छिद्र मोठे होऊन ही वाहिनी फुटली असण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी काढला.
वीज, गॅस पुरवठा खंडित
गुरुवारी निवासी भागातील महानगर गॅस वाहिनी आणि महावितरणची भूमिगत वाहिनी या एमआयडीसी ठेकेदाराकडून सुरू असलेल्या गटाराच्या कामाच्यावेळी जेसीबीचा धक्का लागून नादुरुस्त झाल्या होत्या. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत एमआयडीसीच्या विविध भागातील गॅस, वीज वाहिनीचा पुरवठा बंद झाला होता. रहिवाशांना वीज आणि गॅस विना राहावे लागले.
मिलापनगर तलाव परिसरात काल दुपारी अडीच वाजता गेलेली वीज रात्री दीड वाजता आली. डोंबिवली जीमखाना रस्त्यावर सागर्ली भागात गुरुवारी पहाटे पाच वाजता वीज गेलेला वीज पुरवठा दुपारी चार वाजता पूर्ववत झाला. ऐन उन्हाळ्यात अशी परिस्थिती होत असल्याने येथील नागरिक संतापले आहेत. एमआयडीसी ठेकेदाराचे कर्मचारी प्रत्येक कामात निष्काळजीपणा दाखवीत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. एमआयडीसी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीनी यात लक्ष घालावे, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.
मिलापनगर मधील रहिवासी ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यानी या बेजबादार ठेकेदारावर कारवाई करावी, चुकीच्या पद्धतीने चाललेली गटाराची कामे योग्य पद्धतीने करावी अन्यथा रहिवाशांना सोबत घेऊन आपण एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा दिला आहे.
