डोंबिवली : कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने सुरक्षेची पुरेशी साधने पुरवली नाहीत. त्यामुळे डोंबिवलीत दोन वेगळ्या कामांच्या ठिकाणी एक मजूर तर एक पर्यवेक्षक गंभीर जखमी झाला आहे. पोकलेनने उचललेला अवजड खांब अंगावर पडल्याने पर्यवेक्षकाच्या छातीचे हाड मोडले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक जण दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाला आहे.अनमोल शाहु (वय ३९), अशोककुमार घांची (३२) अशी गंभीर जखमी कामगारांची नावे आहेत.
अनमोल यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण कपलेश्वरा होम्स एल. एल. पी. या बांधकाम कंपनीत पर्यवेक्षक पदावर काम करतो. या कंपनीचे डोंबिवली एमआयडीसीतील विको नाका भागात गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या कामाच्या ठिकाणी आपण गेल्या आठवड्यात कर्तव्यावर होतो. याठिकाणी प्रवीण सोनवणे यांच्या मालकीच्या पोकलेनच्या साह्याने कंपनीच्या जाहिरातीच्या फलकासाठीचे लोखंडी खांब उचलण्यात येत होते. हे खांब एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत असताना तो अचानक पोकलेनच्या पकडीतून तो निसटून आपल्या अंगावर पडला.
आपल्या मानेला, छाती, हाताला गंभीर दुखापत झाली. आपणास काही वेळ श्वास घेण्यास त्रास होत होता. आपणास गंभीर दुखापत झाल्याने स्थळ अभियंता, लेखापाल व इतर कामगारांनी तात्काळ एमआयडीसीतील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे आपल्यावर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथील तपासणीत आपल्या छातीचे हाड मोडले असल्याचे निष्पन्न झाले. कामाच्या ठिकाणी कपलेश्वरा बांधकाम कंपनीने आपणास पुरेशी सुरक्षा साधने पुरवली नाहीत. त्यामुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाला
दुसऱ्या एका प्रकरणात, अशोककुमार घांची (३४) गेल्या महिन्यात कोळेगाव येथील वेताळेश्वर मंदिर भागात एका बांधकामाच्या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर स्लॅब टाकण्याचे काम करत होते. तेथे काम करत असताना ते दुसऱ्या माळ्यावरून जमिनीवर पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोककुमार हे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अशोककुमार यांची पत्नी देवी घांची यांनी आपल्या पतीला ठेकेदाराने पुरेशी सुरक्षा साधने दिली नाहीत, म्हणून ते जखमी झाल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
