डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी परिसरात सिमेंट काँक्रिटचे रस्ते झाले आहेत. वनराईमुळे हा परिसर रम्य वाटतो. अशा परिस्थितीत मागील दोन वर्षापासून सिमेंटचे रस्ते विविध कारणांसाठी तोडले जात आहेत. गटारांसाठी आता झाडे तोडण्यात येत आहेत. या सर्व प्रकाराने एमआयडीसीतील रहिवासी, उद्योजक नियंत्रक संस्थांच्या या तोडफोडी, तोडकामामुळे त्रस्त आहेत. गटारे बांधणीसाठी झाडे तोडलीच पाहिजेत का, असा सवाल करत रहिवाशांनी झाडे तोडण्यास प्रखर विरोध केला आहे. भीमाशंकर येथील विद्युत प्रकल्पासाठी झाडे तोडण्यावरून राज्यात वाद सुरू आहे. झाडे जगवा, वाचवा या फक्त तोंडी घोषणा देऊन उपक्रम राबवून झाडांवर का घाव घातले जात आहेत, असे प्रश्न पर्यावरणप्रेमी करत आहेत. डोंबिवली एमआयडीसी निवासी वसाहतीत जुनी सावली देणारी झाडे आहेत. रहिवाशांनी संगोपन करून या झाडांचा विकास केला आहे. आता एमआयडीसीतील गटारे बांधण्यासाठी गटाराला अडथळा येणारी जुनाट झाडे तोडण्यात येत आहेत.

एमआयडीसी निवासी वसाहतीमधील सेवा रस्त्यावर भूखंड क्रमांक आरएम ३७ समोरील एक मोठे झाड दोन दिवसांपूर्वी काही अज्ञात व्यक्तींनी धारदार करवतीने कापून कोणालाही काही न विचारता वाहनात भरून निघून गेले. त्या व्यक्ती पुन्हा दुसरे त्याच भागातील झाड तोडण्यासाठी आले असतांना स्थानिक रहिवाशांनी त्यांना जाब विचारला. यावेळी या भागात नवीन गटार बनवायचे असल्याने हे पण दुसरे झाड तोडावे लागेल असे त्यांनी सांगितले. या इसमांनी आम्ही एमआयडीसीची गटारे बनविणाऱ्या ठेकेदाराची माणसे आहोत असे सांगितल्यावर स्थानिक रहिवाशांनी झाड तोडायची परवानगी दाखवा म्हटल्यावर आणि अशी विना परवानगी झाड तोडण्यासाठी हरकत घेतल्यावर त्या व्यक्ती त्वरित निघून गेल्या.

याविषयी एमआयडीसीतील रहिवाशांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी गटारे, नाले बांधकामासाठी भुखंड क्रमांक आरएम 3८ समोरील गुलमोहरचे फक्त एक झाड तोडण्यास कल्याण डोंबिवली पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून परवानगी मिळाली असल्याचे सांगितले. त्यामुळे भुखंड आरएम ३७ समोरील दोन झाडे तोडण्यासाठी आलेल्या व्यक्ती कोण होत्या. याबद्दल एमआयडीसी अधिकारी स्पष्ट सांगू शकले नाहीत. या झाड तोडल्याच्या ठिकाणापासून जवळच शैलगंगा मिलापनगर शहरी वन प्रकल्पासाठी एमआयडीसी कडून मिळालेल्या जागेत मागील पावसाळ्यात जंगली झाडे लावण्यात आली असून काही वर्षांनी तेथे जंगल तयार होणार आहे.

एकीकडे संस्था, नागरिक झाडे लावीत आहेत तर विकासाच्या नावाखाली प्रशासनाकडून झाडे तोडली जात आहेत, अशी टीका रहिवाशांनी केली. एमआयडीसी निवासी भागात गेल्या वर्षापासून नवीन नाले, गटारे बनविण्याचे आणि नवीन भूमिगत सांडपाणी वाहिन्या टाकण्याचे काम चालू झाले आहे. यामुळे ठेकेदाराने अनेक झाडे तोडली. एमआयडीसीत प्रदूषण असल्याने स्थानिक सामाजिक संस्था, रहिवाशी यांनी अनेक वर्षापूर्वी झाडे लावली होती. विकासाच्या नावाखाली अशी झाडे तोडल्याने सुमारे वीस टक्के झाडे एमआयडीसीत कमी झाली आहेत. येथील झाडे तोडीच्या विरोधात कोणीही लोकप्रतिनिधी पण बोलत नाहीत. आम्ही लोक फक्त निषेध व्यक्त करून शांत गप्प बसत आहोत, असे रहिवाशांनी सांगितले.