डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी निवास, औद्योगिक विभागात नियोजन शून्य पध्दतीने सीमेंट काँक्रीटचे रस्ते, नाले, गटारांची बांधणी करण्यात आल्याने त्याचा फटका आता स्थानिक रहिवासी, उद्योजकांना मुसळधार पावसाच्या माध्यमांतून बसू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे एमआयडीसीतील निवासी भागातील रस्ते जलमय झाले आहेत. नाले दुथडी वाहत आहेत. रखडलेल्या गटारे, नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आल्याने या भागातील अनेक कंपन्यांच्यामध्ये पाणी घुसून उद्योजकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

यापूर्वी मुसळधार पाऊस पडला की एमआयडीसी भागातील पाणी या भागातील नाले, गटारांमधून थेट खाडीला जाऊन मिळत होते. या भागात मागील पाच वर्षापासून सीमेंट रस्ते कामाला सुरूवात करण्यात आली. या रस्त्यांसाठी भराव करण्यात आले. रस्त्यांची उंची वाढविण्यात आली. त्यामुळे आजुबाजुच्या सोसायट्या, बंगल्यांच्या आवारात साचलेले पाणी वाहून जाण्यास जागा शिल्लक राहिली नसल्याने हे पाणी वाट मिळेल तेथे वाहून जात आहे. सर्व बाजुने एकत्रित आलेले हे पाणी रस्त्यावर तुंबत आहे, असे स्थानिकांनी सांगितले. या भागातील शाळा, महाविद्यालयांच्या अवतीभवती पाण्याची तळी साचली आहेत.

कंपन्यांमध्ये पाणी

औद्योगिक पट्ट्यात काही कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेच्या ठिकाणी पाणी घुसल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. अनेक कंपनी चालकांनी उत्पादक प्रक्रिया बंद ठेवणे पसंत केले आहे. एमआयडीसी फेज दोन मधील मालवण किनारा हॉटेल ते मेट्रोपॉलिटन एक्झोकेम कंपनीपर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. निवासी भागातील वंदेमातरम् उद्यान, सेवा रस्ता, एम्स रुग्णालय रस्ता, चार बिल्डिंग परिसर जलमय झाला आहे. अनेक वाहन चालक या जलमय रस्त्यावरून वाहने नेत आहेत. काही वाहने या पाण्यात बंद पडत आहेत.

कल्याण डोंबिवली पालिकेने एमआयडीसीतील नाले, गटारांची योग्यरितीने सफाई केली नाही. त्याचे चटके आता आम्हाला बसू लागले आहेत, असे रहिवासी, उद्योजकांनी सांगितले. नवीन गटारे, नाले यांची कामे काही ठिकाणी अर्धवट स्थितीत आहेत. विको नाक्याजवळील जीएनपी गॅलरीआ कमर्शियल कॉम्प्लेक्स ते नंदी पॅलेस हॉटेल पर्यंतच्या नवीन नाल्याचे बांधकाम नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या भागातील कामाच्या खड्ड्यात पाणी भरले आहे. या कामाच्या आजूबाजूला चिखल झाला आहे.

कावेरी चौकातील नाल्याचे नवीन बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. नाले सफाईचे काम कल्याण डोंबिवली पालिकेकडेआहे तर नवीन नाले, गटारी बांधण्याचे काम एमआयडीसी आहे. या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय नाही. पूर परिस्थिती निर्माण झाली की या दोन्ही यंत्रणा एकमेकाकडे बोट दाखवून आपली जबाबदारी टाळत असल्याच्या तक्रारी रहिवासी, उद्योजकांनी केल्या.

वरिष्ठ पालिका अधिकारी, लोकप्रधिनिधींचा ठेकेदारांवर वचक नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाला आहे. काही ठेकेदार हे एका लोकप्रतिनिधीच्या दावणीचे असल्याने त्यांच्याविषयी, त्यांच्या कामाविषयी कोणाकडे तक्रार करता येत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी गुपचिळी धरून बसत आहेत, असेही रहिवाशांनी सांगितले. पहिल्या पावसाने एवढी दैना उडवली असताना पावसाचे पुढील तीन महिने कसे काढायचे असे प्रश्न या भागातील नागरिक, उद्योजक करत आहेत.