डोंबिवली : रविवारी रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे डोंबिवली एमआयडीसीत दोन झाडे कोसळून एके ठिकाणी वाहनाचे नुकसान झाले. तर एक झाड घराच्या संरक्षक भिंतीवर कोसळून नुकसान झाले. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी असल्याने अनर्थ टळला.

गेल्या दोन महिन्यापासून डोंबिवली एमआयडीसीत सार्वजनिक रस्ते, बंगले, इमारतींच्या आवारातील एकूण १५ हून अधिक लहान मोठी झाडे कोसळली आहेत. एमआयडीसीत जुनी झाडे कोसळण्याचे प्रमाण अधिक असल्याने या झाडांच्या बचावासाठी काही करता येईल का, याचा विचार पर्यावरणप्रेमी नागरिक करीत आहेत.

मागील पाच वर्षांत एमआयडीसीत अधिक स्थितीतील काँक्रीट रस्त्यांची कामे आहेत. या कामासाठी जेसीबी, पोकलेनच्या साह्याने खोदकाम करण्यात आल्याने झाडांची मुळे तुटली. या झाडांचा मुळांचा आधार तुटल्याने ही झाडे आता माती भुसभुशीत झाल्याने कोसळत असल्याचे पर्यावरण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

वाहनावर झाड कोसळले

डोंबिवली एमआयडीसी निवासी, सुदर्शननगरमध्ये सोमवारी सकाळी ओम अगत्य सोसायटी आवारातील औदुंबराचे झाड कोसळून दोन मोटारींचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन झाड छाटून बाजूला केले, अशी माहिती सोसायटीचे पदाधिकारी सोमा नायर यांनी दिली.

एमआयडीसी निवासी मधील धोकादायक झाडांचा प्रश्न चर्चेत आला असून यावर्षी फक्त एमआयडीसी निवासीत पावसाळ्यात झाड पडलेल्यांची संख्या अंदाजे १५च्या वर गेली आहे. धोकादायक झाडांचे सर्वेक्षण हे कल्याण-डोंबिवली महापालिका व एमआयडीसी यांनी एकत्रित करावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

एमआयडीसी निवासी भागात सोमवारी सकाळी माणिक रत्न सोसायटीच्या आवारातील आंब्याचे मोठे झाड कोसळून ते शिवाई बालक मंदिर शाळेच्या मोकळी जागा असलेल्या मैदानात पडले. यामुळे दोन्ही संरक्षक भिंतीचे नुकसान झाले असून सदर झाड पडण्याच्या वेळी शालेय विद्यार्थी तेथे नसल्याने मोठा अनर्थ टळला.

अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांच्या फांद्याची छाटणी, धोकादायक झाडे तोडणे अशी कामे पालिका प्रशासनाने तातडीने केली पाहिजेत. शिवाय महावितरणकडून उच्च दाबाच्या वाहिन्यांजवळ असणाऱ्या फांद्या फक्त तोडण्यात येतात. या फांद्या तोडताना झाडाचा भार तपासला जात नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूस भार येऊन झाड पडते. महावितरण, केडीएमसी, एमआयडीसी यांनी समन्वय साधून झाडांच्या फांद्याची छाटणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.