डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनींवरून चोरून घेण्यात आलेल्या बेकायदा नळ जोडण्या तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. बुधवारी दिवसभरात कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली, गायत्री शाळा परिसरातील एकूण ३८ अनधिकृत नळ जोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात आली.
एमआयडीसीच्या बारवी धरणाकडून येणाऱ्या कल्याण फिडर जलवाहिनीवर अधिक प्रमाणात स्थानिक रहिवासी, गॅरेज मालक, काही आस्थापना यांनी बेकायदा नळ जोडण्या घेऊन पाणी चोरी करत असल्याचे एमआयडीसी डोंबिवली विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या निदर्शनास येणार नाही अशा पध्दतीने मलंग रस्ता भागातील एमआयडीसीच्या जलवाहिनीवर घेण्यात आलेल्या पाण्याच्या चोरीच्या नळ जोडण्यांचा सर्व्हे केला.
यावेळी अधिकाऱ्यांना गायत्री शाळा परिसर, नांदिवली तर्फ भागात काही स्थानिक रहिवासी, गॅरेजवाले, दुकानदार यांनी चोरीच्या नळ जोडण्यात घेतल्या असल्याचे निदर्शनास आले. काही नळ जोडण्या मुख्य जलवाहिनीला वेल्डिंग यंत्राने छिद्र पाडून त्यामध्ये वाहिका टाकून त्या वाहिकेला जलवाहिनीला वेल्डिंगच्या साहाय्याने बंदिस्त करून चोवीस तास पाणी पुरवठा घेतला जात होता. हे चोरीचे पाणी असल्याने या माध्यमातून एमआयडीसीचा पाणी शुल्काचा महसूल बुडविला जात होता. अशाप्रकारे हे पाणी चोर एमआयडीसीची पाणी चोरी करून महसूल बुडवित असल्याने अधिकाऱ्यांनी कारवाईचा निर्णय घेतला.
नळ जोडण्या तोडल्या
आपल्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे डोंबिवली एमआयडीसी विभागातील पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता, साहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक साहाय्यक, सुरक्षेसाठी विशेष कमांडो पथक बुधवारी सकाळी मलंगगड रस्ता भागात जेसीबी, तोडकाम पथक घेऊन गेले. त्यांनी एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवरून चोरीच्या नळ जोडण्या वेल्डिंग यंत्र, काही नळजोडण्या जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकल्या. ही कारवाई होत असताना विशेष कमांडो पथक असल्याने कोणीही रहिवासी, आस्थापना मालक या कारवाईला विरोध करण्यासाठी पुढे आले नाही.
प्लास्टिकचे २० ते ३० फुटाचे पाईप जलवाहिनीला जोडून त्या माध्यमातून ही पाणी चोरी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या वाहिका जेसीबीच्या साहाय्याने तोडून टाकण्यात आल्या. या सर्व वाहिका जप्त करून एमआयडीसीच्या भंगार साहित्य तळावर नेण्यात आल्या. या कारवाईने परिसरातील रहिवाशांमध्ये आता पाणी मिळणार नाही म्हणून अस्वस्थता पसरली होती. कल्याण पूर्व आडिवली, ढोकळी परिसर बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखले जाते. या भागाला पालिकेच्या जलवाहिन्यांवरून स्थानिकांनी चोरून पाणी पुरवठा घेतला असल्याच्या तक्रारी आहेत.
एमआयडीसीने बेकायदा नळ जोडण्या तोडण्याची मोहीम सुरू केल्याने पाणी चोरांमध्ये खळबळ उडाली आहे. अशीच कारवाई काटई ते बदलापूर रस्त्यावरील पाणी चोरांवर होणार असल्याची चर्चा आहे.
