डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागातील मिलापनगर गणपती विसर्जन तलावात मागील तीन दिवसांपासून शेकडो मासे मरून पाण्यावर तरंगत आहेत. मृत माशांचा तलावा काठी खच पडला आहे. कडक उन्हाचा तडाखा ,निर्माल्यामुळे प्रदुषित झालेले पाणी त्यामुळे हा प्रकार घडला आहे, असे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

मिलापनगर तलावात विविध प्रकार, जातीचे मासे आहेत. स्थानिक रहिवासी या माशांचे संवर्धन होईल यादृष्टीने प्रयत्नशील असतात. माशांचा विचार करून तलावात शुध्द पाणी राहील याची काळजी घेतात. या तलावात विविध प्रजातीची कासवे आहेत. कडक उन्हामुळे कासवेही अस्वस्थ असल्याचे चित्र तलावातील हालचालींवरून दिसत आहे, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.कल्याण डोंबिवली पालिकेच्या नियंत्रणाखाली हा तलाव आहे. या तलावाची नियमित स्वच्छता केली जाते. पाणी खराब झाले असेल तर त्याचा उपसा केला जातो.

गेल्या तीन दिवसांपासून तलावातील शेकडो मासे मृत झाल्याने तलावा काठी दुर्गंधी पसरली आहे. या मृत माशांविषयी पालिकेत तक्रारी केल्यानंतर पालिका कामगारांनी येऊन तलावातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे. पर्यावरण दिन उंबरठ्यावर आला असतानाच तलावातील मासे मृतावस्थेत आढळल्याने पर्यावरण प्रेमींनी खंत व्यक्त केली आहे. अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक मिलापनगर तलाव भागात येऊन विविध निसर्ग, तलाव संवर्धनाचे उपक्रम राबवून पर्यावरण दिन साजरा करतात.

काही दिवसापूर्वी कल्याणच्या प्रसिद्ध काळा तलावातील मासे मृतावस्थेत आढळले होते. उन्हाच्या कडक झळा आणि उन्हामुळे पाणी प्रमाणापेक्षा अधिक तप्त होत असल्याने आणि जल प्रदुषणामुळे पाण्यातील प्राणवायुची पातळी कमी झाली की त्याचा माशांना फटका बसतो. असे प्रकार घडतात, असे पर्यावरणप्रेमी सांगतात. मिलापनगर गणपती विसर्जन तलावात काही वर्षापूर्वी मासे मेले होते. मिलापनगर रेसिडेंड्स वेलफेअर असोसिएशन आणि डोंबिवली वेलफेअर असोसिएशन यांनी केलेल्या याचिकानुसार राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशाने गेल्या दहा वर्षापासून या तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी आहे. या तलावात फिरण्यासाठी येणारे नागरिक निर्माल्य आणि कचरा टाकत असल्याने तलावातील पाणी अस्वच्छ होत आहे.

तलाव भागात एक कायमस्वरूपी सुरक्षारक्षक, सफाई कामगार नियुक्त करावा.सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, नियमित साफसफाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या तलावाकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर काही दिवसांनी हा तलाव नामशेष होईल अशी भीती स्थानिक रहिवासी व्यक्त करतात.