डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील नाले, गटारांची कामे करणाऱ्या ठेकेदाराने निकृष्ट दर्जाची कामे केली आहे. यासंदर्भात माहिती अधिकार अर्ज एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लावून, तो अर्ज मागे घेण्यासाठी नाले कामाच्या ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाकडे १५ लाखाची खंडणी मागणाऱ्या नवी मुंबई, भिवंडी आणि पनवेलमधील चार तथाकथित खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्त्यांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारी, पाच मोबाईल, रोख रक्कम असा एकूण २१ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दीपेश गौतम लोखंडे (३९, रा. ओमकार अपार्टमेंट, घणसोली गाव, नवी मुंबई), नरेश राजेंद्र सूर्यवंशी (२९, रा. समता नगर, गणपती तलाव बाजुला, सेक्टर १, रबाळे, नवी मुंबई), राहुल सुधाकर मुकादम (३०, मुकादम निवास, रिलायन्स पेट्रोलपंप मागे, कोनगाव, भिवंडी), विशाल गंगाराम जानकर (३१, रा. ओम निवास, प्लाॅट नं. १, सेक्टर ५, करंजाळे, पनवेल) अशी अटक केलेल्या खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्त्यांची नावे आहेत.

काय आहे प्रकरण

डोंबिवली एमआयडीसीत मे. अजवानी-मेटकाॅन जाॅईन्ट व्हेंचर कंपनी नाले, गटार बांधणीचे काम एमआयडीसी डोंबिवली कार्यकारी अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली करते. या नाले, गटारांची कामे या कंपनीने निकृष्ट दर्जाची केली आहेत. अशाप्रकारचा माहिती अधिकार अर्ज या चार खंडणीखोरांनी कार्यकारी अभियंत्यांकडे दाखल केला होता. या माहितीच्या अनुषंगाने संबंधित ठेकेदारावर कारवाईसाठी तगादा लावला होता. ही कारवाई टाळायची असेल आणि माहिती अधिकार अर्ज मागे घेण्यासाठी या खंडणीखोरांनी मे. अजवानी-मेटकाॅन कंपनीच्या पर्यवेक्षकाकडे १५ लाख रूपये खंडणी देण्यासाठी तगादा लावला होता.

आपले काम नियमानुसार असुनही हे चार इसम आपल्या कंपनीसह पर्यवेक्षकाला पैसे उकळण्यासाठी त्रास देतात म्हणून या कंपनीच्या पर्यवेक्षकाने कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती.

सापळ्याची रचना

या चारही खंडणीखोरांना खंडणी देण्याची बनावट तजवीज ठेकेदार कंपनीकडून पोलिसांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली आणि त्यांना पकडण्यासाठी सापळा लावण्यात आला. मे. अजवानी मेटकाॅन कंपनीच्या पर्यवेक्षकाने पोलिसांच्या सूचनेप्रमाणे या चारही खंडणीखोरांना १५ लाख रूपये देण्याची तयारी दर्शवली. ही रक्कम डोंबिवली एमआयडीसीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाजवळील एक बर्गर दुकानात स्वीकारण्याचे चारही इसमांनी मान्य केले.

गुरूवारी हे चारही इसम आपल्या दोन मोटारींमधून ठरल्या ठिकाणी आले. या बर्गर दुकानाच्या बाजुला गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला होता. खंडणीची रक्कम देण्यासाठी कंपनी पर्यवेक्षक दुकानात गेला. तेथे चहापाणी, गप्पा झाल्यावर पर्यवेक्षकाने १५ लाखाची रक्कम या चार इसमांच्या ताब्यात दिली. या इसमाने बाहेरील पोलिसांनी इशारा करताच पोलीस पथक दुकानात घुसले आणि त्यांनी चारही तथाकथित इसमांना अटक केली.

या इसमांनी आणखी काही ठिकाणी अशाप्रकारचे धंदे केले आहेत का याचा तपास करण्यासाठी अशाप्रकारे त्रस्त नागरिक, ठेकेदार, विकासकांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने केले आहे. या इसमांवर मानपाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खंडणी विरोधी पथकाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अजित शिंदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक एस. एम. तावडे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी शिंदे, हवालदार गुरूनाथ जरग, सुधीर कदम, मिथुन राठोड, सतिश सोनावणे, सचिन कदम, गोरक्ष रोकडे यांच्या पथकाने केली.