KDMC encroachment drive Dombivli MIDC: डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त केल्यानंतर पालिका प्रशासनाने डोंबिवली शहर परिसरातील मुख्य वर्दळीचे रस्ते, गल्ली बोळांमधील फेरीवाले हटविण्याची जोरदार मोहीम सुरू केली आहे. शनिवार सुट्टीच्या दिवशी पालिका अधिकाऱ्यांनी डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी परिसरातील रिजन्सी इस्टेट, रिजन्सी अनंतम, नंदी पॅलेस हाॅटेल परिसर, पेंढारकर महाविद्याल ते घरडा सर्कल दरम्यानच्या १५० हून अधिक टपऱ्या, हातगाड्यांचा चुराडा, तर काही अवजड टपऱ्या जप्त केल्या.

ही कारवाई सुरू असताना या टपऱ्या, हातगाड्या वाचविण्यासाठी पालिकेतील काही सत्ताधारी आणि पक्षीय पदाधिकाऱ्यांचे सर्वाेच्च नेते धडपत करत होते. अनेक टपरी, हातगाडी, तात्पुरते गाळेधारकांनी पालिका अधिकाऱ्यांना डोंबिवलीतील काही राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवकांची नावे सांगून त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हा व्यवसाय करत असल्याचे सांगितले. ही नावे ऐकून पालिका अधिकारी आवाक झाले.

डोंबिवली शिळफाटा रस्ता, एमआयडीसी, २७ गाव हद्दीत अनेक स्थानिक तथाकथित राजकीय पदाधिकाऱ्यांनी आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून आपल्या परिसरात टपऱ्या, हातगाड्या सांभाळणारी माणसे नेमली आहेत. काहींनी पदपथ, झाडांचे आडोसे घेऊन पत्र्यांचे निवारे उभारले आहेत. या माध्यमातून लहान मोठे व्यवसाय करून हे टपरी चालक व्यवसाय करतात. आणि त्यामधील उत्पन्नाचा हिस्सा दरमहा आपल्या संकटमोचक राजकीय पदाधिकाऱ्याला देतात.

मारहाण पडली महाग

डोंबिवली एमआयडीसी भागातील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय आणि माऊली सभागृह मधील अरूंद गल्ली १०० हून अधिक फेरीवाल्यांच्या टपऱ्या, हातगाड्यांनी अडवून ठेवली होती. या भागातून संध्याकाळी चार ते रात्री उशिरापर्यंत वाहन नेणे तर शक्य नव्हते. पण पादचाऱ्यांना चालणे अवघड होते.

डोंबिवलीतील खाऊ गल्ली म्हणून ही गल्ली ओळखली जात होती. या गल्लीतील हातगाडीवर खिमापाव, पाणीपुरी, भेळपुरी, वडापाव आणि विविध प्रकारचे चटपटीत जिन्नस मिळत होते. पालिकेला या हातगाडी चालकांकडून एक पैशाचा महसूल मिळत नव्हता.

या खाऊ गल्लीच्या परिसरात रुग्णालये, सभागृह, महाविद्यालय, खासगी आस्थापना यांची कार्यालये आहेत. त्यांना या ठिकाणी वाहने उभी करणे, चालविणे अवघड होते. पदपथ, रस्ते नागरिकांना चालण्यास मोकळे करा, असे आदेश आयुक्त अभिनव गोयल यांनी साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. या आदेशाप्रमाणे पेंढारकर महाविद्यालयाजवळील खाऊ गल्ली ई प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाने जेसीबीने बेचिराख केली. यावेळी एक हातगाडी चालक चंद्रकांत कदम यांनी फेरीवाला हटाव पथकातील सुरेश कामराज या कामगाराला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

फेरीवाल्यांची ही दादागिरी पाहून या परिसरातील फेरीवाल्यांचे कंबरडे कायमचे मोडण्याचा निर्धार प्रशासनाने केला. उपायुक्त अतुल झेंडे यांनी मुबलक पोलीस बळ पालिकेला बंदोबस्तासाठी उपलब्ध करून दिले.

पालिका उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या उपस्थितीत शनिवारी ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे, फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रसादु ठाकुर, ग प्रभागाचे भारत पवार यांच्या उपस्थितीत शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी इस्टेट, नंदी पॅलेस हाॅटेल, पेंढारकर महाविद्यालय ते घरडा सर्कल भागातील रस्ते, पदपथ, रस्ते, गल्लीबोळ अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. अशाच पध्दतीने डोंबिवली जीमखाना ते सागर्ली, एमआयडीसी मिलापनगर, सुदर्शननगर भागातील फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.

टपऱ्यांचा चुराडा

फेरीवाला हटाव पथकाने या भागातील १०० हून अधिक टपऱ्यांचा जागीच जेसीबीच्या साहाय्याने चुराडा केला. काही अवजड टपऱ्या जप्त करून त्या पालिकेच्या भंगार तळावर नेल्या. या कारवाईने फेरीवाल्यांना मुजोरी सहन केली जाणार नाही असा इशारा पालिकेने दिला आहे.