डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील सर्वाधिक वर्दळीच्या लोकमान्य टिळक पुतळा ते शेलार नाका दरम्यानच्या रस्त्याचे गुरुवारी पालिकेच्या ठेकेदाराने डांबरीकरण केले. हे डांबरीकरण रस्ते सुस्थितीत करण्याच्या सर्व नियमांचा भंग करून निकृष्ट पद्धतीने करण्यात आले आहे. या डांबरीकरणाचा थर उखडला आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे या डांबरीकरण रस्त्याची एका दिवसात वाताहत झाली आहे. त्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी मनसेचे डोंबिवली जिल्हा सचिव अरुण जांभळे यांनी शुक्रवारी पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे.

तसेच, या ठेकेदाराने मागील काही दिवसांत ज्या रस्त्यांवर अशा पद्धतीची डांबरीकरणाची कामे केली आहेत. त्या रस्ते कामाचे एकही देयक पालिकेने त्या ठेकेदाराला देऊ नये, अशी मागणी जिल्हा सचिव जांभळे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. भाजपचे नगरसेवक तथा उपमहापौर राहुल दामले यांनी गुरुवारी या रस्ते कामाचे पितळ उघड केले होते. ही रस्ते सुस्थितीकरणाची निकृष्ट कामे तातडीने थांबवून रस्ते सुस्थितीत राहतील अशा पद्धतीचा खडी, डांबरीचा गिलावा रस्ते कामासाठी वापरण्याची सूचना उपमहापौर दामले यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांना केली होती.

मनसेचा दौरा

मनसेचे जिल्हा सचिव अरुण जांभळे यांनी गणेशोत्सवापूर्वी असे मलमपट्टी केलेले निकृष्ट रस्ते सुस्थितीकरण करण्यात येत असतील तर हे रस्ते येत्या आठवड्याभरात उखडून जातील. गणेश भक्तांना खड्ड्यांमधून गणपतीच्या मिरवणुका काढाव्या लागतील. हा विचार करून जांभळे यांनी शहराच्या विविध भागांत आपल्या पदाधिकाऱ्यांसह फिरून पालिकेकडून सुरू असलेल्या रस्ते सुस्थितीकरण कामाची पाहणी केली. यावेळी त्यांना लो. टिळक पुतळा ते शेलार नाका दरम्यान करण्यात आलेल्या निकृष्ट रस्ते डांबरीकरण कामाची पाहणी केली. हे काम ठेकेदाराने अतिशय निकृष्ट खडी, डांबर वापरून केले असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले.

या निकृष्ट कामामुळे रस्त्यावर खडी वर आली आहे. त्यावर घसरून दुचाकस्वार पडत आहेत. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन हे निकृष्ट काम तातडीने थांबवून हे काम नव्याने व्यवस्थित करण्यात यावे, अशी मागणी जांभळे यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केली. दहीहंडी निमित्त या परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक तसेच बालगोपाळांची ये-जा होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील खडीमुळे कोणताही अपघात घडून नागरिकांच्या अथवा बालगोपाळांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास पालिका फ कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जांभळे यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

यावेळी रस्ते पाहणी दौऱ्याच्यावेळी मनसेचे उपजिल्हा सचिव उदय वेळासकर, उपशहर अध्यक्ष रमेश यादव आणि दीपक शिंदे उपस्थित होते. निकृष्ट काम झालेल्या ठिकाणी चांगले साहित्य वापरून रस्ता सुस्थितीत केला जाईल, असे आश्वासन पालिका अभियंत्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई होईपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला लढा सुरूच ठेवेल. रस्ते डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारांच्या कामाची पाहणी केल्याशिवाय पालिकेने एकाही ठेकेदाराचे देयक अदा करू नये. -अरुण जांभळे, मनसे जिल्हा सचिव, डोंबिवली.