डोंबिवली – शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली, कल्याणमधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात दाखल करून घेतल्याने युतीमध्ये बेबनाव झाल्याचे चित्र कल्याण डोंबिवली शहरात असतानाच, रविवारी मनसेच्या येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी शिंदे शिवसेना आणि भाजपमधील युती धर्म तोडणाऱ्यांनाही भाजप धडा शिकवणार असून, येत्या दोन दिवसात शिंदे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होतील, असा इशारा भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी दिला.

मागील पाच दिवसापूर्वी भाजपचे डोंबिवली, कल्याणमधील काही पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे शिवसेनेने भाजपच्या कल्याण, डोंबिवलीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद न साधता आपल्या पक्षात दाखल करून घेतले. शिंदे शिवसेना आणि भाजपने स्थानिक पातळीवरील आपले पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात दाखल करून न घेण्याचा अलिखित नियम दोन्ही पक्षांमध्ये झाला आहे. त्यामुळे मागील आठ ते नऊ महिन्यांपासून भाजपने शिंदे शिवसेनेतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यास इच्छुक असुनही त्यांना भाजपने पक्ष प्रवेश दिला नाही, असे भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी स्पष्ट केले होते.

मनसेला खिंडार

शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये युती धर्म तोडण्यावरून जोरदार धुसफूस सुरू असताना, रविवारी मनसेचे शेकडो पुरूष, महिला कार्यकर्ते मनसेच्या पदाधिकारी सुमेधा थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये दाखल झाले. कल्याण जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक दीपेश म्हात्रे, नगरसेवक शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मनसेच्या स्थानिक नेत्यांनी गेल्या आठवड्यात भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी, नगरसेवकांवर टीकेचे लक्ष्य करून त्यांच्या राजकीय प्रवासावर टिपण्णी केली होती. यामुळे मनसे आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली होती. भाजपने मनसेला स्थानिक पातळीवर धडा शिकवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याची परिणिती मनसेचे पदाधिकारी भाजपमध्ये घेऊन त्याचे उट्टे भाजपने काढले असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेला धडा

शिंदे शिवसेनेने आमचा एक फोडला तर आम्ही त्यांचे दोन पदाधिकारी फोडू, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी गेल्या आठवड्यात शिंदे गटाला दिला होता. या फोडाफोडीवर बोलताना नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले, आम्ही शिंदे शिवसेना आणि भाजप युती धर्माचे पालन करतो. दोन्ही पक्षांनी एकमेकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते फोडायचे नाहीत असे अलिखित ठरले असताना गेल्या आठवड्यात आम्हाला पूर्वकल्पना न देता शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे पदाधिकारी फोडून शिंदे शिवसेनेत दाखल करून घेतले. त्यामुळे त्यांनी युती धर्म तोडला आहे. आम्ही कोणाच्याही दारात आमच्या पक्षात या म्हणून कोणाला सांगत नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवर विश्वास ठेऊन इतर पक्षातील पदाधिकारी आमच्या पक्षात दाखल होतात. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी याच विश्वसाने आमच्या पक्षात प्रवेश केला आहे.

युती धर्म तोडण्याचे काम शिंदे शिवसेनेने केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांनाही आता धडा शिकवणार आहोत. मागील अनेक महिन्यांपासून शिंदे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांना येत्या दोन दिवसांपासून भाजपमध्ये प्रवेश देण्यास आम्ही सुरूवात करणार आहोत. त्याचे प्रत्यक्षदर्शी चित्र आपणास पाहण्यास मिळेल, असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.