डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील मोठागाव रेल्वे फाटकातील रस्ता खराब झाल्याने या फाटकातून वाहने संथगतीने धावत होती. यामुळे रेल्वे फाटक परिसरात प्रवाशांना दररोज वाहनकोंडीला सामोरे जावे लागत होते. रेल्वे मार्गातील खराब रस्ता आणि प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची माहिती स्थानिक भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू प्राधिकरणाच्याअधिकाऱ्यांकडे केली. या सततच्या पाठपुराव्याने अखेर बुधवारी रात्रीपासून मोठागाव रेल्वे फाटकातील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले असून येथे रबराचे अस्तरीकरण करण्यात येत आहे.
डोंबिवली परिसरातून ठाणे, मुंबईत जाण्याचा मधला मार्ग म्हणून अलीकडे वाहन चालक, प्रवासी माणकोली उड्डाण पुलाला पसंती देतात. या सततच्या वाहन वर्दळीमुळे मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकातील रस्ता सतत खराब होतो. रेल्वे मार्गातील रस्ता खराब झाल्याने वाहन चालक या रेल्वे मार्गातून वाहने अतिशय संथगतीने चालवितात. त्यामुळे रेल्वे फाटकात मागील महिन्यांपासून वाहन कोंडी होत होती. रेल्वे मार्गातील रस्ता सतत खराब होऊ नये म्हणून रस्ते पृष्ठभागावर ‘रबराइज्ड पॅनेल’चा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वे फाटक परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहन चालकांना अधिक सुरक्षित व सुरळीत प्रवास करता येण्यास मदत होणार आहे. तसेच, रस्ता डांबरीचा असला की त्यावर वाहनांची सतत ये-जा असल्याने डांबरी रस्त्याला खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक होते, तो प्रकार यापुढे होणार नसल्याचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
निधी येऊन दीड वर्ष उलटले तरी काम रखडलेच
मोठागाव रेल्वे फाटक हा परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था दूर व्हावी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा, यासाठी नगरसेवक दिपेश पुंडलिक म्हात्रे यांनी या रस्त्याच्या सुव्यवस्थेसाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.
नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे, असे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. मोठागाव रेल्वे फाटकावरील उड्डाण पुलाचे काम लवकर मार्गी लागेल यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत, असे म्हात्रे यांनी सांगितले. या उड्डाण पुलासाठी निधी येऊन दीड वर्ष होत आले तरी या पुलाचे काम रखडले असल्याची माहिती त्यांनी दिली.
