डोंबिवली – डोंबिवली पश्चिम माणकोली उड्डाण पुलाकडे जाणाऱ्या मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकावर पूल उभारणीच्या कामास कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. यापूर्वीच वसई-पनवेल रेल्वे मार्गिकेवरील या रेल्वे फाटकातील पुलाच्या कामासाठी शासने १६१ कोटीचा निधी मंजूर केला आहे. शासन, रेल्वेच्या अत्यावश्यक मंजुऱ्या या कामासाठी यापूर्वीच मिळाल्या आहेत. स्थायी समितीने या पुलाच्या कामास मंजुरी दिल्यामुळे या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा पुर्ण झाला आहे.

डोंबिवलीतून ठाणे, मुंबईत जाण्यासाठी प्रवासी माणकोली पुलाचा वापर करतात. मोठागाव रेल्वे फाटकातील वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे या फाटकावर उड्डाणपूलाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या रेल्वे फाटकावर पूल उभारणीचा प्रस्ताव स्थायी समितीत मंगळवारी मांडण्यात आला. या चार पदरी रेल्वे मार्गावरील पुलाच्या प्रस्तावाला स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पुलाच्या कामासाठी शासनाने चार वर्षापूर्वी १६१ कोटी मंजूर केले आहेत. या रकमेतील १३५ कोटी रूपये बाधितांचे पुनर्वसन, भूसंपादन या कामासाठी, १२ कोटी रेल्वे मार्गावरील पुलाच्या कामासाठी, उर्वरित रक्कम पुलाच्या दोन्ही बाजूकडील पोहच मार्गासाठी खर्च करण्यात येणार आहे.

२००७ पासून पुलाचा प्रवास

मोठागाव रेल्वे फाटकावर पूल उभारण्याची संकल्पना सर्वप्रथम २००७ मध्ये माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांनी मांडली होती. महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी या पुलाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू मार्गिका प्रकल्पाचे काम सुरू झाल्यामुळे मोठागाव पुलाच्या कामाला स्थगिती मिळाली. सुरुवातीला हा पूल एक मार्गिका स्वरूपात होता. भविष्यातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि डोंबिवलीतील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता हा पूल चार पदरी करण्यासाठी रेल्वे, शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्यामुळे २०१७ मध्ये चार पदरी पुलाच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. माणकोली पुलामुळे रेतीबंदर रेल्वे फाटकातील वाहनांचा भार वाढला आहे.

मोठागाव रेल्वे फाटकातील पूल हा डोंबिवलीतील वाहतूक कोंडीवर उपाय ठरणारा विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. २००७ पासून सुरू झालेला या पुलाच्या मागणीचा टप्पा अनेक संघर्षानंतर आता मार्गी लागत आहे. – दीपेश म्हात्रे, भाजप नगरसेवक.