डोंबिवली – पुणे येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी राज्याच्या विविध भागात ९९ नांदी संमेलने भरविण्यात येत आहेत. या नांदी संमेलनापैकी अकरावे नांदी संमेलन भरविण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या डोंबिवली शाखेला मिळाला आहे. ४ ऑक्टोबर रोजी डोंबिवली एमआयडीसीतील शगुन सभागृह येथे होणाऱ्या या दिवसभराच्या संमेलनात ‘माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा आणि साहित्य’ विषयावर विचारमंथन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डाॅ. प्रा. धनश्री साने यांनी दिली.
सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत हे संमेलन पार पडणार आहे. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष, विचारवंत डाॅ. विनय सहस्त्रबुध्दे, प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक अरूण शेवते, स्वागताध्यक्ष भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्घाटक समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे आहेत.
सकाळी साडे नऊ वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी ज्येष्ठ भरतनाट्यम नर्तक पवित्र भट यांच्या शिष्या गणेश वंदना सादर करणार आहेत. मराठी भाषा विभागातर्फे एक चित्रफित दाखविण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता ‘कृत्रिम प्रज्ञा आणि साहित्य’ विषयावरील पहिल्या परिसंवादात कृत्रिम प्रज्ञा तज्ज्ञ दीपक शिकारपूर, मीनाक्षी अत्रे सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी मुलाखतकार क्षितिज देसाई संवाद साधणार आहेत. दुपारी दोन वाजताच्या परिसंवादात ‘जाहिरात विश्व आणि कृत्रिम प्रज्ञा’ विषयावरील परिसंवादात तंत्रज्ञान क्षेत्र तज्ज्ञ सौरभ करंदीकर, ‘साहित्य विश्व आणि कृत्रिम प्रज्ञा’ विषयावरील परिसंवादात पत्रकार श्रीकांत बोजेवार सहभागी होणार आहेत. दुपारी तीन वाजता होणाऱ्या परिसंवाद प्रा. नितीन बानगुडे-पाटील ‘कृत्रिम प्रज्ञा, जगातील आजचा तरूण आणि कृत्रिम प्रज्ञा’ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी सहकार भारतीचे सहसंस्थापक सतिश मराठे यांच्या हस्ते एशियाटिक सोसायटी, कल्याण गायन समाज यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित काकडे करणार आहेत.
‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ यांच्या सहयोगाने हे नांदी संमेलन पार पडणार आहे. या नांदी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेचे अध्यक्षा डाॅ. प्रा. धनश्री साने, उपाध्यक्ष जयंत कुलकर्णी, कोषाध्यक्ष सुनील जोशी, कार्यवाह रवींद्र फडणीस, सहकार्यवाह आरती मुनीश्वर, तसेच, डाॅ. ललिता नामजोशी, डाॅ. प्रा.डाॅ. वृंदा कौजलगीकर, प्रा. डाॅ. उज्जवला कारंडे, ज्येष्ठ पत्रकार कविता मयेकर, डाॅ. धनंजय साने, मेघना कुलकर्णी, विनय मणेरीकर, सचिन चोगले, प्रदीप गोसावी, ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’चे कार्यकारी संपादक प्रभू कापसे, विवेक पंडित, ज्येष्ठ पत्रकार सई बने, सामाजिक कार्यकर्ते माधव जोशी, ज्येष्ठ पत्रकार सुलभा कोरे, प्रा.डाॅ. विनय भोळे, डॉ. प्रल्हाद देशपांडे, मनोज मेहता प्रयत्नशील आहेत.
