डोंबिवली : एका खासगी कंपनीत भाडेतत्त्वावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाला परदेशी व्यक्तीने मारहाण केल्याचा प्रकार डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडीत नुकताच उघडकीस आला. व्यंकटेश नाय़डू (वय २५) असे मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
काही दिवसापूर्वी नायडू यांच्या प्रवासी वाहनासाठी डोंबिवली पूर्वेकडील राजाजी रस्ता भागातील एकाने नोंदणी केली. राजाजी पथ आयरे रस्ता गल्ली क्रमांक चार येथील आरोग्यविषयक सेवा देणाऱ्या केंद्रातून बाहेर पडलेल्या नायजेरियन व्यक्तीने स्वत:कडील वैद्यकीय कचरा नायडू यांच्या वाहनात घेण्याची सूचना नायडू यांना केली. त्यावर वैद्यकीय कचऱ्यासाठी अधिकचे भाडे आकारून नायडू यांनी नायजेरियन व्यक्तीस वाहनात बसण्यास मुभा दिली.
वाहन काही अंतर पुढे गेल्यानंतर नायजेरियन व्यक्तीने नायडू यांना वाहन थांबविण्याची सूचना केली. त्यानंतर हातातील कचरा रस्त्याकडेला फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला नायडू यांनी त्याला विरोध केला. वैद्यकीय कचरा रस्त्यात फेकताना त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण होईल व पालिका दंड ठोठावेल, या भीतीने नायजेरियन व्यक्तीला रोखले. त्यावर नायडू यांनी सागर्ली रस्ता बालाजी मंदिरालगत नायजेरियन व्यक्तीला उतरण्यास सांगितले व त्याच्याकडून भाड्यापोटी ७० रुपये मागितले. त्यावर नायजेरियन व्यक्तीने वैद्यकीय कचरा पुढे फेकण्यास नायडूना सूचवले. मात्र, त्याला नकार दिल्याने आरोपीने वैद्यकीय कचरा व भाड्याचे सर्व पैसे परत करण्याचा आग्रह धरला. त्याला नकार देताच त्याने रागाच्या भरात आपणास हाताच्या बुक्क्यांनी डोक्यात मारहाण केल्याचे नायडू यांनी तक्रारीत म्हटले आहे. यात नायडू जखमी झाले. त्यांच्यावर शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
