डोंबिवली – शालेय जीवनापासून जडलेल्या दुर्धर आजारावर मात करत डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील निखील नरेश म्हात्रे या तरूणाने उच्चतम श्रेणीत शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर येथील माॅडर्न महाविद्यालयातून पदवीचे (बी. एम. एस.) शिक्षण पूर्ण करून आता भिवंडी येथील चौगुल महाविद्यालयातून कायद्याची पदवी (एल. एल. बी.) प्राप्त केली आहे. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत निखीलने हे यश संपादन केल्याने त्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
निखील हा कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागातील अधीक्षक नरेश म्हात्रे यांचा मुलगा आहे. कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने तात्काळ एल. एल. एम. शिक्षणासाठी प्रवेश घेऊन पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. निखील सध्या मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीचा सराव करत आहे. परदेशात जर्मनी येथे जाऊन कायद्यातील उच्चतम शिक्षण घेण्याची त्याची इच्छा होती. त्याच्या आजारामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याला तेथे जाण्यास मज्जाव केल्याने त्याने मुंबईत राहुन आपले उच्चतम पातळीवरचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
शालेय जीवनापासून त्रास
निखीलला शालेय जीवनापासून एक दुर्धर आजार सुरू झाला. या आजारामुळे त्याला घर, शाळेत अर्धा तासाच्या वर बसता येत नव्हते. अधिकतम वेळ बसले तर त्याला विविध प्रकारच्या वेदना होत होत्या. शालेय शिक्षण सुरू असताना या आजाराची माहिती मिळाल्यावर निखीलच्या पालकांनी मुंबई परिसरातील तज्ज्ञ डाॅक्टरांकडून त्याच्यावर उपचार करून घेतले. या नियमितच्या उपचारामुळे तो दुर्धर आजारातून अनेक टक्क्यांनी बरा झाला. शाळेत, महाविद्यालयात असल्यावर त्याला वर्गात, परीक्षाच्या काळात अधिक बसणे शक्य नसल्याने, शाळा व्यवस्थापनाशी संपर्क करून त्याची तेवढ्या वेळेपुरती सोय करून अभ्यासक्रम, परीक्षा देण्याची व्यवस्था केली जात होती.
अनेक वेळा परीक्षा सुरू असायची आणि निखीलला बसणे शक्य होत नव्हते. अशावेळी निखीलचे आई, वडील त्याला उचलून शाळेत, परीक्षेच्या ठिकाणी घेऊन जात होते. त्याला जेवढा वेळ बसणे शक्य आहे. तेवढा वेळ तेथे थांबुन त्याला बसणे अवघड झाले की मग तेथून उचलून पुन्हा आपल्या घरी घेऊन येत होते. त्यामुळे निखीलचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याच्या आई, वडिलांनी त्याच्यासाठी खडतर मेहनत घेतली.
दुर्दम्य इच्छाशक्ती
कठोर परिश्रम करण्याची तयारी, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आहे त्या परिस्थितीवर मात करून आपण पुढे जाऊ शकतो हा त्याच्या ठायी असलेला विश्वास त्याच्या शैक्षणिक प्रगतीची वाटचाल सुकर करत आहे. एल. एल. बी. ची परीक्षा सुरू असताना अचानक निखीलला बसण्याचा त्रास सुरू झाला. परीक्षा द्यायचीच या विषयावर तो ठाम होता. अखेर त्याच्या आई, वडिलांनी परीक्षेच्या काळात उचलून परीक्षा केंद्रावर नेला. एका पेपरला तर फक्त अर्धा तास बसता आले. त्यानंतर त्याला बसण्याचा प्रचंड त्रास सुरू झाला. त्या अर्धा तासात सोडविलेल्या उत्तरपत्रिकेत त्याने चांगले गुण मिळवून यश संपादन केले, असे त्याच्या पालकांनी सांगितले.
लोकल प्रवास
निखील दररोज डोंबिवलीतून वातानुकूलित लोकलने मुंबईत प्रवास करतो. दिवसभर उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करून संध्याकाळी घरी परततो. टप्प्याने वकिलीचा अभ्यास, सराव आणि त्यानंतर न्यायदान क्षेत्रातील परीक्षा देऊन न्याय व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग होण्याचे निखीलचे स्वप्न आहे. ते आपण पूर्ण करू, असा विश्वास त्याला आहे. निखील नवी मुंबईतील डी. वाय. पाटील महाविद्यालायतून एल. एल. एम.चे शिक्षण पूर्ण करत आहे.
