डोंबिवली – डोंबिवली जवळील निळजे लोढा हेवन येथील आठवडी बाजार फेरीवाल्यांचे स्थानिक पुढारी आणि संबंधित जमीन मालकाकडून सतत कारवाई करूनही भरविला जातो. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेच्या ई प्रभाग फेरीवाला हटाव पथक आणि पालिका मुख्यालयातील मध्यवर्ति फेरीवाला हटाव पथक यांनी शुक्रवारी या बेकायदा आठवडी बाजारावर पुन्हा आक्रमक कारवाई केली. यावेळी फेरीवाल्यांचे पुढारी, फेरीवाल्यांनी, बाजारासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या जमीन मालकाने फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी यांना धुक्काबुक्की केली. कामगारांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. फेरीवाला हटाव पथकाच्या कारवाईत अडथळा आणला, कामगारांना धक्काबुक्की केली, आठवडी बाजारासाठी जागा उपलब्ध करून दिली म्हणून ई प्रभाग फेरीवाला हटाव पथकाचे पथकप्रमुख सुरेश कामराज यांच्या तक्रारीवरून निळजे लोढा हेवन येथील कासारिओ रस्त्यालगत ग्रीन टाॅवरजवळ बेकायदा आठवडी बाजार भरविणारे जागा मालक राज पाटील, विनीत आणि इतर दोन फेरीवाले यांच्या विरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
आक्रमक कारवाई
फेरीवाल्यांची ही दादागिरी मोडून काढण्यासाठी ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त सचीन तामखेडे आक्रमक झाले. त्यांनी ई प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक आणि पालिका मुख्यालयातील उपायुक्तांच्या मध्यवर्ति फेरीवाला हटाव पथकाला फेरीवाल्यांचे पुढारी, जागा मालक यांच्या विरोधाला न जुमानता फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. फेरीवाल्यांनी फेरीवाल्यांचे सामान जप्तीची कारवाई सुरू केली. यावेळी फेरीवाल्यांचे समूह कामगारांच्या अंगावर धाऊन त्यांना धक्काबुक्की करू लागले. जागा मालक राज पाटील कामगारांच्या कारवाईत सर्वाधिक अडथळा आणत होते. काही फेरीवाल्यांनी पालिका कामगारांच्या अंगावर वाहन घालून त्यांना मारण्याचा, सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
फेरीवाले आक्रमक होताच मानपाडा पोलिसांनी फेरीवाल्यांचा विरोध मोडून काढला. या घटनेची माहिती समजताच अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त प्रसाद बोरकर निळजे लोढा हेवन येथे पोहचले. या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फेरीवाले, त्यांचे पुढारी, जमीन मालक यांचा विरोध मोडून बेकायदा आठवडी बाजारावर कारवाई करून तो बंद करण्यात आला. यावेळी फेरीवाल्यांचे एक टेम्पो सामान जप्त करण्यात आले.
आयुक्त गंभीर
महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आठवडी बाजार बंद करण्याबाबत आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाने अनधिकृत आठवडी बाजारांविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने इ प्रभाग क्षेत्रातील लोढा हेवन, निळजे येथील ग्रीन पार्क टॉवरच्या मागील बाजूस दर शुक्रवारी भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजारावर कारवाई करण्यात आली.
या ठिकाणी बाजार भरू नये यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच संबंधित विभागांची बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पालिका क्षेत्रातील अनधिकृत आठवडी बाजारांवर यापुढेही नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून, शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जगदंबा बाजार सुरूच
डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथील जगदंबा माता मंदिर परिसरात दर गुरूवारी दुपारी चार ते रात्री १० वाजेपर्यंत स्थानिक भूमाफियांच्या आशीर्वादाने मागील चार महिन्यांपासून बेकायदा आठवडी बाजार सुरू आहे. या बेकायदा बाजारावर पालिकेच्या ह प्रभागाकडून कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे मध्यवर्ति फेरीवाला हटाव पथकाने याठिकाणी कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.
