Ajinkya Pagare Agniveer selection Katai Dombivli: डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे गावातील संकल्प संस्था संचालित सर्वोदय विद्यालयातील माजी विद्यार्थी अजिंक्य रखमा पगारे याची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. अग्निवीर म्हणून या भागातून निवड झालेला तो पहिला विद्यार्थी आहे. अजिंक्य काटई गावचा रहिवासी आहे.

अजिंक्य पगारे याला शालेय जीवनापासून लष्करी गणवेश, सैन्य, सैनिक यांची विशेष आवड होती. सैन्य दलात जाण्यासाठी अभ्यास बरोबर आपली शरीरयष्टी उत्तम राहील याची तो नेहमी काळजी घेत असे. पगारे कुटुंब डोंबिवली जवळील काटई गावात राहते. अजिंक्यचे वडील पनवेल येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. आई शिवणकाम करते. अजिंक्यची मोठी बहिण एम.काॅम. आहे. अजिंक्यचे बालवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण निळजे गावातील सर्वोदय विद्यालयात झाले.

पगारे कुटुंब मुळचे नाशिक जिल्ह्यातील सुरेगाव येथील रहिवासी आहे. अजिंक्यला दहावीमध्ये ६३ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने पनवेल येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण विद्यालयात वेल्डर म्हणून शिक्षण पूर्ण केले. वेल्डर म्हणून काही ठिकाणी काम केले. परंतु, कोणत्याही परिस्थितीत भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशाची सेवा करायची ही त्याची इच्छा होती. अजिंक्यचे त्याने घेतलेल्या प्रशिक्षणात मन रमत नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांनी दिलेल्या पाठबळामुळे अजिंक्यने लष्करी शिक्षण घेण्यासाठी जळगाव येवला येथील आनंद गुंड यांच्या डिफेन्स ॲकेडमीत प्रवेश घेतला.

तेथे त्याने लष्करी सेवेचे यशस्वी प्रशिक्षण, शिक्षण घेतले. कष्ट, ध्येय आणि जिद्दीच्या जोरावर लष्करी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतीय सैन्य दलाकडून झालेल्या अग्निवीर भरती प्रक्रियेच्या सर्व कसोट्या, परीक्षा अजिंक्य पगारे याने मागील काही महिन्यात पार पाडल्या. वैद्यकीय चाचण्यांमध्ये तो यशस्वी झाले. शारीरिक क्षमता चाचणीत तो यशस्वी झाला. त्याची अग्नीवीर म्हणून भारतीय सैन्य दलात आता निवड झाली.

‘मनात इच्छा प्रबळ असेल आणि आपण त्या दिशेने वाटचाल सुरू ठेवली तर नक्कीच ती इच्छा आपली पूर्ण होते हे मी केलेल्या वाटचालीतून सिध्द झाले आहे. त्यामुळे तरूणांनी मनात जीवन वाटचालीत काय करायचे हे पहिल्या पासून ठरवले तर नक्कीच ती इच्छा पूर्ण होते. त्यामुळे नोकरी मिळत नाही याविषयी कोणीही खचून जाऊ नये,’ असा संदेश अंजिक्य तरूणांना देतो. सर्वोदय विद्यालयचे संचालक महेंद्र पाटील, मुख्याध्यापक वीरेंद्र पाटील आणि मार्गदर्शक शिक्षकांनी या वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले, असे अजिंक्यने सांगितले.