डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत रेल्वे प्रशासनाने निळजे ते लोढा गृहसंकुल दरम्यान एक बोगदा नागरिकांना येण्या जाण्यासाठी बांधून दिला आहे. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबत आहे. मुसळधार पाऊस असला की या बोगद्यात कंबरभर पाणी असते. त्यामुळे निळजे गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी, महिलांचे हाल होत आहेत.

निळजे गावातील ग्रामस्थांचे बहुतांशी व्यवहार लोढा गृहसंकुल भागात आहेत. या गावातील बहुतांशी मुले लोढा गृहसंकुल परिसरातील शाळांमध्ये, खासगी शिकवणीसाठी, तसेच रहिवासी बाजारपेठेसाठी याच भागात जातात. मध्य रेल्वेने निळजे गावाजवळील लोढा गृहसंकुलकडे जाणारे रेल्वे फाटक दोन महिन्यापूर्वी बंद केले. हे फाटक बंद करण्यापूर्वी फाटक भागात भुयारी मार्ग बांधून देण्याची मागणी निळजे ग्रामस्थांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली होती. अधिकाऱ्यांनी ती मागणी मान्य केली होती. परंतु, एक दिवस रेल्वेने निळजे गावाजवळील रेल्वे फाटक ग्रामस्थांच्या भुयारी मार्गाची पूर्तता न करता रेल्वेने बंद केले. निळजे गावातून रेल्वे फाटकातून गेले की लोढा हेवन गृहसंकुल कमी अंतरावर होते. त्यामुळे ग्रामस्थ याच मार्गाला सर्वाधिक प्राधान्य देत होते.

हेही वाचा…उल्हासनगर : पप्पू कलानीपुत्र ओमी कलानी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांना सोयीचे होणार नाही अशा पध्दतीने रेल्वेने एका बोगदा बांधला आहे. हा बोगदा सखल आणि खोलगट भागात आहे. या बोगद्यातून निळजे ग्रामस्थांना लोढा हेवन भागात जाता येते. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबते. हे पाणी जाण्यासाठी या भागात गटार किंवा अन्य कोणतीही सोय नाही. त्यामुळे बोगद्यात पाणी तुंबून राहते. या बोगद्यातून प्रवाशांची वर्दळ असते. त्याच बरोबर मोटारी, लहान मालवाहू वाहने याच बोगद्यातून धावतात. त्यामुळे बोगद्यात पाऊस नसला की चिखल होतो. आणि पाऊस सुरू असला की बोगद्यात पाणी तुंबते. मुसळधार पावसात कंबरभर पाणी साचते. त्यामुळे ग्रामस्थांना या भागातून जाणे मुश्किल होते.

मुलांना लोढा हेवन भागातील शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिला, मुलांचे या बोगद्यातील पाणी तुंबण्याचा सर्वाधिक त्रास होतो. ग्रामस्थांना विश्वासात न घेता घाईघाईने हा बोगदा बांधला आहे, अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या. गावापासून दूर अंतरावर हा बोगदा आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत या बोगद्यातून येणे धोकादायक आहे. रात्रीच्या वेळेत निळजे ग्रामस्थांची, नोकरदाररांची मोठी अडचण होते.

हेही वाचा…डोंबिवलीत घराच्या छतावर चढलेल्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

निळजे गावातून बाहेर पडण्यासाठी रेल्वे फाटक हा एक मधला मार्ग होता. तोच रेल्वेने बंद केल्याने ग्रामस्थांचे खूल हाल सुरू आहेत. ग्रामस्थांना पाणी तुंबलेल्या बोगद्यातून सध्या प्रवास करावा लागतो.