डोंबिवली : रिक्षाचालकांना प्रवाशांशी सहजगत्या मराठीतून संवाद साधता यावा यासाठी रिक्षा चालक मालक संघटनेने अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा संवाद कार्यशाळेचे दोन महिन्यांपासून आयोजन केले होते. या कार्यशाळेत मराठी भाषा अवगत व बोलण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अमराठी रिक्षा चालकांना प्रमाणपत्रे वाटप करण्याचा कार्यक्रम डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचापाडा येथील श्री गजानन महाराज मंदिर केंद्रात रविवारी पार पडला.

या कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन विभागातील साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अक्षया बनसोडे, रिक्षा चालक मालक युनियनचे अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, भिकाजी झाडे, विश्वंभर दुबे, सुरेंद्र मासाळकर, रोशन पवार, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रशिक्षक अस्मिता सावंत, अनुकूल माळी उपस्थित होते.

‘जय महाराष्ट्र, मी मराठी शिकलो, मी आता प्रवाशांशी मराठीतूनच बोलणार,’ अशाप्रकारची शपथ प्रशिक्षकांनी अमराठी रिक्षा चालकांना दिली. या प्रशिक्षण वर्गात अधिक संख्येने अमराठी रिक्षा चालकांनी सहभागी व्हावे. शासन आदेशाचे पालन करावे यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल विशेष प्रयत्नशील होते.

प्रवाशांशी रिक्षा चालकाने मराठीतून संवाद साधला पाहिजे हा शासनाचा जुना आदेश आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. या आवाहनाला अमराठी रिक्षा चालकांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रवाशांशी रिक्षा चालकाने कसे आदरयुक्त भाषेत बोलावे याचेही प्रशिक्षण अमराठी रिक्षा चालकांना देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी आरटीओ अधिकारी, अस्मिता सावंत, अनुकूल माळी यांनी विशेष मेहनत घेतली, असे रिक्षा संघटनेचे शेखर जोशी यांनी सांगितले.

गजानन महाराज केंद्रात सुमारे ७०हून अधिक अमराठी रिक्षाचालकांनी मराठी भाषा संवादाचे प्रशिक्षण पूर्ण केले. या सर्वांना आरटीओ अधिकारी अक्षया बनसोडे, अंकुश म्हात्रे, भिकाजी झाडे व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. भाजप वाहतूक आघाडी भाजपचे प्रदेशाध्यक्ष, तथा डोंबिवली रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी वाहतूक आघाडीच्या वतीने डोंबिवली येथील वीर सावरकर रोड येथील सावरकर मैदानात येथे दोन महिन्यांपासून अमराठी रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा शिकवणी वर्गाचे मोफत आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रात राहत असताना मराठी भाषा आलीच पाहिजे, या उद्देशाने हे वर्ग घेण्यात आले. रिक्षा चालकांनी प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या यशस्वी रिक्षा चालकांना जिल्हाध्यक्ष नंदू परब, डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.