डोंबिवली – शासनाच्या आवश्यक विभागाच्या परवानग्या न घेता डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील चार क्रमांकाच्या प्रवेशव्दारासमोर विष्णुनगर मासळी बाजाराच्या लगतच्या एका गाळ्यात चोरून ऑनलाईन जुगार, लाॅटरी चालवला जातो. मानपाडा पोलिसांच्या पथकाने रविवारी संध्याकाळी या अड्ड्यावर छापा टाकून एका अड्डा चालकासह दोन ग्राहकांवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याठिकाणाहून ४० हजार रूपयांचे साहित्य जप्त केले.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांच्या सूचनेवरून मानपाडा पोलिसांच्या पथकाने विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत येऊन ही कारवाई केली. याप्रकरणात जुगार अड्डा चालक सवालाल हरजी पटेल, ग्राहक नीतेश चंद्रकांत पाटील (रा. कोपरखैरणे, नवी मुंबई), सचिन अर्जुन मोरे (रा. खंडोबा मंदिर, कुंभारखाणपाडा, डोंबिवली) यांच्या विरूध्द जुगार प्रतिबंधक कायद्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार विकास माळी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

या अड्डयावरून पोलिसांनी संगणक, छपाई यंत्र, रोख रक्कम, जुगारासाठी लागणारी साधने असे एकूण ४० हजाराहून अधिक रकमेचे साहित्य जप्त केले. वरिष्ठांच्या आदेशावरून मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण आणि पोलीस पथकासह रविवारी संध्याकाळी सहा वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळ पोहचले. साध्या वेशातील एका पोलिसाने विष्णुनगर मासळी बाजार इमारतीजवळील एका गाळ्यात जाऊन ऑनलाईन जुगार अड्डा सुरू असल्याची खात्री केली.

या अड्ड्या भोवती साध्या वेशात साखळी करून असलेल्या साहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण आणि त्यांच्या पथकाने या गाळ्यात प्रवेश केला. तेथे अड्डा चालक सवालाल पटेल याला पोलिसांनी ऑनलाईन जुगार अड्डा चालविण्याची परवानगी आहे का, याची विचारणा केली. त्यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखवण्यास असमर्थता दर्शवली. तेथे जुगार खेळण्यास आलेल्या नीतेश पाटील, सचिन मोरे यांचीही पोलिसांनी चौकशी केली. या गाळ्यात असलेल्या वायफाय यंत्रणेच्या माध्यमातून हा ऑनलाईन उपयोजनाच्या माध्यमातून हा जुगार अड्डा चालविला जातो, अशी माहिती पटेल याने पोलिसांना दिली.

जुगाराची पध्दत

पटेल याने पोलिसांना ऑनलाईन जुगार अड्डा कसा खेळला जातो याची माहिती दिली. हा जुगार, लाॅटरी खेळ १५ मिनिटाचा असतो. सकाळी १० ते रात्री १० हा खेळ चालतो. ० ते १०० क्रमांकाची एकूण १० घरे असतात. एका घरात ० ते ९९ आकडे असतात. ग्राहक या घरातील कोणत्याही आकड्यांवर २ रूपयांपासून ते वाढीव रकमा लावू शकतात.

१५ मिनिटाने या जुगार, लाॅटरीचा निकाल लागतो. या निकालाप्रमाणे ग्राहकाने पैसे लावलेला आकडा यशस्वी झाला की ती लावलेली रक्कम गुणिले १८० रूपये या पटीने विजेत्या ग्राहकाला पैसे मिळतात. ग्राहकाने २ रूपयांचे १०० नंबर खरेदी केले तर त्यामधील २० रूपये ते अड्डा चालकाला अदा करतात. विजेता क्रमांक हा बारकोडने तपासला जातो. आणि येथील सर्व व्यवहार रोखीने होतात, असे पटेल याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी सर्व साहित्य जप्त केले. अड्डा चालक आणि तेथील ग्राहकांविरूध्द जुगार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला. या कारवाईत मानपाडा पोलीस ठाण्यातील हवालदार केशव भोये, योगेश आडे, संगणक तज्ज्ञ तेजस गिरे सहभागी झाले होते.