डोंबिवली : येथील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयासमोरील रस्त्यावर बुधवारी रात्री विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने दोन मोटार व रिक्षाला जोरदार धडक दिल्याने वाहनांचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन जण किरकोळ जखमी झाले. या अपघातामुळे पेंढरकर महाविद्यालयासमोरील परिसरातील रस्त्यावर काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. इतर वाहने या अपघात झालेल्या मोटारींच्या भागात अडकून पडली. येथील रस्त्यावर एक तास वाहतूक कोंडी झाली होती. डोंबिवली स्थानकाहून शिळफाटा दिशेने जाणारी वाहने, शिळफाटा, कल्याणकडून येणारी वाहने एमआयडीसीतील पेंढरकर महाविद्यालय समोरील रस्त्यावरून धावतात.

विरुद्ध मार्गिकेतून भरधाव येणाऱ्या कारने मार्गिकेतील वाहनांना धडक दिली. कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने दोन मोटारी व रिक्षाला वाहनाने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेतच्या जोरदार आवाज झाल्याने रस्त्यावरील नागरिक भयभीत झाले. काही जण वाट फुटेल त्या दिशेने धावू लागले. काही वेळाने चालकाने मोटारीवर नियंत्रण आणले.

कल्याण-शिळ महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी होते. या वाहन कोंडीतून मुक्तता करण्यासाठी अनेक वाहन चालक विरूद्ध मार्गिकेतून येऊन सुसाट वेगाने वाहने चालवितात. त्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी करण्याची मागणी स्थानिक रहिवासी, व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी सांगितले, दररोज वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, पादचारी, रहिवासी आणि विद्यार्थी त्रास सहन करतात. काही मुजोर चालक विरूद्ध दिशेने वाहने घेऊन प्रवास करतात. त्यामुळे असे अपघात घडतात.

जी घटना घडली, यामध्ये वाहनांचे नुकसान तर झालेच, परंतु वाहतूक पोलिसांचा वचक न राहिल्यामुळे ही स्थिती उद्भवली. यासाठी वाहतूक पोलिस प्रशासनाने त्वरित उपाययोजना केली पाहिजे. मुजोर चालकांवर कठोर कारवाई केली पाहिजे. ‘एमआयडीसीतील रस्ते आता मोठे व काँक्रीटचे झाले आहेत. त्यामुळे वाहन चालक मिळेल त्या मार्गिकेतून जीवाची पर्वा न करता सुसाट वेगाने दुचाकी, मोटारी चालवतात. विरुद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे,’ असे सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.