Dombivli Pendharkar College Research Patents: येथील एमआयडीसी भागातील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापकांच्या संधोधनातून पूर्ण केलेल्या प्रकल्पांना भारत सरकारच्या पेंटट कार्यालयाने (स्वामीत्व हक्क) पेंटट बहाल केले आहे. या स्वामीत्व हक्कांमुळे पेंढरकर महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
पेंढरकर महाविद्यालय शैक्षणिक, संशोधन, क्रीडा, माहिती आणि तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे. अशा परिस्थितीत या महाविद्यालयाच्या, इतर महाविद्यालयातील प्राध्यापकांना, येथील संशोधक मार्गदर्शक प्राध्यापकांमुळे त्यांच्या प्रकल्पांवर स्वामीत्व हक्क मिळाल्याने महाविद्यालयात समाधानाचे वातावरण आहे.
महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील विद्यावाचस्पतीचे ( पीएच.डी.) विद्यार्थी प्राध्यापक अनिकेत मराठे यांनी संशोधन करून गोगलगायींच्या प्रजातींचे सहज आकलन व्हावे म्हणून एक उपकरण विकसित केले आहे. अभ्यासपूर्ण आणि संशोधनातील सर्व निकष पूर्ण करून प्रा. मराठे यांनी हे उपक्रम विकसित केले आहे. या उपकरणाला स्वामीत्व हक्क मिळण्यासाठी प्रा. मराठे यांनी भारत सरकारच्या पेंटट विभागाकडे नोंदणीकरणासाठी अर्ज केला होता. प्रा. मराठे यांच्या उपकरणाची, सादरीकरण आणि संशोधनाची पूर्ण पडताळणी करून पेंटट विभागाने प्रा. मराठे यांना पेंटट बहाल केले आहे.
प्रा. अनिकेत मराठे हे मुरबाड जवळील शिवळे येथील शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान आणि गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाचे साहाय्यक प्राध्यापक आहेत.
प्रा. मराठे हे पेंढरकर महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक, संशोधक प्रा. डाॅ. शरद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पतीचा (पीएच.डी.) अभ्यास करत आहेत. याच महाविद्यालयातील कॅ. डाॅ. वर्षा नरवडे, अर्जुन शाहू यांनी विकसित केलेल्या प्रकल्पांच्या स्वामीत्व हक्कांसाठी भारत सरकारच्या पेंटट कार्यालयाकडे यशस्वीपणे नोंद करण्यात आली आहे.
पेंढरकर महाविद्यालयातील संशोधक आणि प्राध्यापक यांनी संशोधन क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल लवंगारे, पारले येथील डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. विनय भोळे यांनी संशोधक मार्गदर्शक प्रा. डाॅ. शरद महाजन, प्रा. अनिकेत मराठे, कॅ. डाॅ. वर्षा नरवडे, अर्जुन शाहू यांचा विशेष सन्मान केला.
विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी शिक्षण घेत असताना संशोधनाकडे वळावे. संशोधनातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो आणि चांगले प्रकल्प आकाराला येतात. अशाच संशोधन प्रकल्पातून राष्ट्र कार्यासाठी हातभार लागणाऱ्या प्रकल्पांची उभारणी होत असते. प्राध्यापक संशोधनवृत्तीचा असेल तर त्या शैक्षणिक संस्थेचा नावलौकिकही वाढत असतो. त्यामुळे विद्यार्थी, प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधनाभिमुख व्हावे. शिक्षण संस्थाही अशा उपक्रमांसाठी सहकार्य करेल, असे मुख्य कार्यकारी लवंगारे यांनी सांगितले.
