डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील बापूसाहेब फडके, नेहरू रस्ता हा नागरी वस्ती, बाजारपेठेचा भाग आहे. या रस्त्यावर फटाके विक्रेत्यांना कल्याण डोंबिवली पालिकेने परवानगी देऊ नये, अशी मागणी फडके रस्ता भागातील विविध सोसायट्यांमधील रहिवासी, व्यापारी यांनी पालिकेच्या फ प्रभाग साहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. अशाप्रकारची तक्रार प्राप्त होताच रहिवाशांच्या तक्रारीवरून फ प्रभाग अतिक्रमण नियंत्रण पथकाने बापूसाहेब फडके रस्त्यावरील बेकायदा फटाके स्टाॅल तोडून टाकले.

या कारवाईने पालिकेच्या परवानग्या न घेता डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात फटाके विक्रीचे स्टाॅल लावणाऱ्या विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यामधील बहुतांशी फटाके विक्रेते हे स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने फटाके स्टाॅल लावत असल्याचे पालिका पथकाच्या निदर्शनास आले. या फटाके स्टाॅलवर कारवाई केल्यावर राजकीय मंडळी पालिकेच्या वरिष्ठांना संपर्क करून बेकायदा फटाके स्टाॅलवर कारवाई करू नका म्हणून मागणी करत असल्याचे समजते.

कल्याण ग्रामीणमध्ये कार्यक्षेत्र असताना एक लोकप्रतिनिधी डोंबिवलीत सुरू असलेल्या नियमबाह्य गोष्टी सावरण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी, नियमबाह्य पध्दतीने साहाय्यक आयुक्त नियुक्तीसाठी, फेरीवाला हटाव पथक प्रमुख नियुक्तीसाठी, बेकायदा हाॅटेलवर, रुग्णालयाच्या शेडवर कारवाई न करण्यासाठी सर्वाधिक दबाव आणत असल्याने पालिका अधिकारी त्रस्त आहेत.

एकीकडे रहिवासी, व्यापारी फडके रोडवर बेकायदा स्टाॅल लावून देण्यास विरोध करत आहेत. त्या विरोधाला डावलून राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने काही फटाके विक्रेते फडके रोडवर पालिकेच्या परवानग्या न घेता फटाके विक्रीचे रस्ते,पदपथ अडवून स्टाॅल टाकत असल्याने स्थानिक रहिवासी, व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

रस्ते, पदपथ अडवून फटाके स्टाॅल उभारले जात असल्याने ग्राहकांना दुकानात येण्यास जागा राहत नाही. ग्राहकाने फटाके विक्रेत्याला फटाके बाजुला ठेवण्यास सांगितले तर त्याला दमदाटी केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे दिवाळी सणात नेहरू रस्ता, फडके रस्ता, डाॅ. रस्ता, रामनगर, मानपाडा रस्ता भागात फटाके विक्रेते, रहिवासी,व्यापारी यांच्यातील शीतयुध्द तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.